हे सरकार ८ महिन्यांत खाली येईल – देवेंद्र फडणवीस

हे सरकार ८ महिन्यांत खाली येईल – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

राज्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर खातेवाटपाला मुहूर्त लागला असून त्यावर आज राज्यपालांनी मोहोर उमटवली. मात्र, यामुळे विरोधी पक्ष समाधानी नसून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये बोलताना विद्यमान सरकारवर कठोर टीका केली. ‘देशाच्या राजकीय इतिहासात बेईमानी करून आलेलं सरकार ७ ते ८ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकलेलं नाही. हे सरकरा देखील त्याहून जास्त काळ टिकणार नाही’, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यात ते बोलत होते.

‘पहिल्यांदाच जनतेनं न निवडलेलं सरकार’

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारवर बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली. ‘आम्ही ऐकलं होतं की लोकशाहीत जनता सरकार निवडून देतं. जनतेनं सरकार निवडून देखील दिलं. पण देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच जनतेनं निवडून न दिलेलं सरकार अस्तित्वात आलं आहे. बेईमानी करून आणि जनादेशाचा अपमान करून हे सरकार तयार झालेलं आहे. महाराष्ट्रात भाजपनं जितक्या जागा लढवल्या, त्यातल्या ७० टक्के जागा भाजपनं जिंकल्या. आपण वर्गात पहिले आलो. पण ४० टक्के मार्क मिळालेले ३ विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी आपल्याला वर्गाबाहेर काढलं’, असं फडणवीस यावेळी म्हणाले.


हेही वाचा – राष्ट्रवादीच्या खात्यात सर्वाधिक बजेटची खाती!

‘अजूनही यांची मारामारी सुरू’

यावेळी फडणवीसांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या नाराजीवर तोंडसुख घेतलं. ‘खातेवाटप झाल्यानंतर देखील यांची मारामारी सुरू आहे. कुणी राजीनामा देतंय. कुणी ऑफिस सोडतंय. कुणी घरीच बसतंय. फक्त मालपाणी कमावण्यासाठी हे सगळे लोक एकत्र आले आहेत’, अशी टीका त्यांनी केली. ‘सरकारी योजनांचा पैसा शेवटच्या माणसापर्यंत हे पोहोचू देणार नाहीत. हा पैसा जिरवण्याचं काम हे करतील’, असं देखील ते म्हणाले.

First Published on: January 5, 2020 3:58 PM
Exit mobile version