लोकसभेसाठी भाजपाचे मिशन ४५, तर विधानसभेसाठी २००; फडणवीसांची घोषणा

लोकसभेसाठी भाजपाचे मिशन ४५, तर विधानसभेसाठी २००; फडणवीसांची घोषणा

“मविआ सरकार काळात संपूर्ण सरकार मला जेलमध्ये टाकण्यासाठी कामाला लागली होती, ही जबाबदारी ज्यांच्याकडे दिली होती ते जेलमध्ये गेले, पण मी नाही, आतापर्यंत मी हे कधी सांगत नव्हतो. कारण मी यांच्या बापालाही घाबरत नाही.” असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नाशिकमध्ये असून भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर आसूड ओढलेत.

समर्पण दिनानिमित्त नाशिकमध्ये आज भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणूक २०२४ साठी ‘मिशन २००’ चा संकल्प केल्याचं जाहीर केलंय. तसंच लोकसभेसाठी ‘मिशन ४५’ राबवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मविआने अडीच वर्षे वाया घालवली. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी आपली घरं भरण्याचा प्रयत्न केला. या अडीच वर्षात सगळे प्रकल्प ठप्प होते, त्यामुळे पुढील अडीच वर्षात आपल्याला पाच वर्षाची कामे करावी लागणार आहेत.”

अडीच वर्षामध्ये एक तरी अशी गोष्ट आहे का मविआ सरकारजवळ, एक तरी प्रकल्प दाखवा, महाराष्ट्राकरता आम्ही हे केलं असं सांगता येईल अशी एक गोष्ट,एक शेतीकरता घेतलेला निर्णय दाखवा, एक रस्ता दाखवा, एक मेट्रोची व्यवस्था दाखवा, यांनी घेतलेला एकही निर्णय नाही. अडीच वर्ष खुर्च्या तोडण्याचं काम केलं. सोबतच आपलं तीन पायांचं ऑटो रिक्षा सरकार कधीही गडगडेल म्हणून रोज भ्रष्टाचाराची टी-२० खेळली.” असा आरोपही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला.

यापुढे बोलताना ते पुढे म्हणाले, “मला जेलमध्ये टाकण्यासाठी यांनी जंग जंग पछाडलं, संपूर्ण सरकार मला जेलमध्ये टाकण्यासाठी मागे लागली होती, पण ते काहीच करू शकले नाही. मला जेलमध्ये टाकण्याची जबाबदारी ज्याला दिली ते जेलमध्ये गेले, पण मी नाही.” असा गौप्यस्फोटही देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

“जे सरकार आता आलंय ते गद्दारांचं सरकार नव्हे तर खुद्दाराचं सरकार आहे. गद्दारांचं सरकार तर ते होतं ज्यांनी २०१९ साली लोकांनी दिलेल्या मताचा अवमान करून, पाठीमध्ये खंजीर खुपसून या महाराष्ट्रात स्थापन झालं. त्या गद्दारांच्या सरकारमधून खुद्दार बाहेर पडले, गद्दार त्या ठिकाणी खाली पडले…खुद्दारांनी आपल्यासोबत येऊन हे सरकार स्थापन केलं…म्हणून हे खुद्दारांचं सरकार आहे.” असा हल्लाबोल मविआ सरकारवर केला.

First Published on: February 11, 2023 7:46 PM
Exit mobile version