सामनात अग्रलेख आला म्हणजे आमचा घाव सत्ताधाऱ्यांच्या वर्मी बसला – फडणवीस

सामनात अग्रलेख आला म्हणजे आमचा घाव सत्ताधाऱ्यांच्या वर्मी बसला – फडणवीस

सामनात अग्रलेख आला म्हणजे आमचा घाव सत्ताधाऱ्यांच्या वर्मी बसला - फडणवीस

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी पार पडलं. या अधिवेशनात मनसुख हिरेन प्रकरणाचा मुद्दा विरोधी पक्ष भाजपने चांगलाचं लावून धरला. याच पार्श्वभूमीवरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. लोकांच्या जगण्या-मरण्याचे अनेक प्रश्न सतावत आहेत. त्यावर विधिमंडळात चर्चा घडवून विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला धारेवर धरले असते तर उत्तमच झाले असते, पण एका संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रुप आहे. लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहे हे विरोधी पक्षाला कधी कळणार?, असा शिवसेनेनं सामना अग्रलेखातून सवाल करत भाजपवर सडेतोड टिका केली आहे. सामना अग्रलेखावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘सभागृहातील आमच्या भूमिकेबद्दल सामनात अग्रलेख आल्यामुळे कदाचित आमचा घाव सत्ताधाऱ्यांच्या वर्मी बसला आहे,’ असं फडणवीस म्हणाले.

नक्की काय म्हणाले फडणवीस?

गुरुवारी सकाळी देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘जनहिताचे मुद्दे जशी आमची जबाबदारी आहे, तशी वृत्तपत्राची जबाबदारी आहे. आम्ही सभागृहात वीजेबद्दल बोलो, शेतकऱ्यांबद्दल बोलो, आम्ही कोविड बद्दल बोलो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाही. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. त्यामुळे याबद्दल सामनात अग्रलेख आल्यामुळे घाव वर्मी बसला आहे, असं दिसतंय.’

‘अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काहीच मिळालं नाही’

पुढे फडणवीस म्हणाले की, ‘सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून काहीच मिळालं नाही. सर्वात जास्त विदर्भ आणि मराठवाड्याची निराशा झाली. संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची निराशा या अधिवेशनाने केली.’

‘कोरोनाकडे सरकारचं कुठंलही लक्ष नाही आहे. त्याकरता कोणत्याही व्यवस्था होत नाही आहेत. कोरोना हा अधिवेशनाच्या आधी वाटतो, ज्यावेळेस अधिवेशन सुरू असतं, त्यावेळेस तो कमी असतो आणि अधिवेशन संपल्यानंतर तो पुन्हा वाटतो, मी उपहासात्मक पद्धतीने बोलतोय कारण सरकारला फक्त अधिवेशन टाळण्याकरता त्या ठिकाणी कोरोना दिसतो. बाकीच्या वेळेला सरकारला कोरोना दिसत नाही. सध्या परिस्थिती भयावह आहे. ज्याप्रभावी उपाययोजना केल्या पाहिजेत, त्या सरकारकडून कुठेही केल्या जात नाही आहे. लॉकडाऊनही ही उपाययोजना नाही आहे,’ असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाझेंचे वकील


 

First Published on: March 11, 2021 8:30 AM
Exit mobile version