बायकोला शिट्या मारतो म्हणून केला थेट खून; बिबट्याच्या हल्ल्याची पसरवली अफवा

बायकोला शिट्या मारतो म्हणून केला थेट खून; बिबट्याच्या हल्ल्याची पसरवली अफवा

सिल्लोड : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारीला शेतात गव्हाला पाणी भरण्यास व मटण पार्टीस जाणाऱ्या एका २८ तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची बातमी सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे पसरली होती मात्र तो बिबट्याचा हल्ला नसून त्याचा खून केला असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाचा आरोपीने चाकूने हल्ला करून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनीही तत्परता दाखवत आरोपीला २४ तासात अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दी.१) रोजी आरोपी गणेश कैलास चव्हाण या वय २४ वर्षीय युवकाने रविंद्र अंबादास काजळे या २८ वर्षीय युवकाचा चाकूने वार करून खून केला होता. या संदर्भात मयताचा भाऊ समाधान अंबादास याने दिलेल्या फिर्यादी नुसार पोलिसांनी सोमवारी (दी.२) सायंकाळी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत अवघ्या चोवीस तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

दरम्यान, आरोपीला अटक केल्यावर त्याच्या चौकशीत काही बाबी समोर आल्या आहेत. मयत रवींद्र हा आरोपी गणेशच्या बायकोला गल्लीतून जाता येता वाईट नजरेने बघत असे, तसेच तीला शिट्या मारत असे, याबाबत गणेशने रवींद्रला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, रवींद्रने त्याच्याकडे दुर्लक्ष करत त्याचा नित्यक्रम सुरूच ठेवला. याच गोष्टीचा मनात राग धरून गणेश ने रवींद्रचा काटा काढयचाच असे ठरवून त्याचा खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.

First Published on: January 4, 2023 7:41 PM
Exit mobile version