वांद्रे ते सांताक्रुझमधील सहा सोसायटींना मालमत्ता करात सवलत

वांद्रे ते सांताक्रुझमधील सहा सोसायटींना मालमत्ता करात सवलत

वांद्रे ते सांताक्रुझमधील सहा सोसायटींना मालमत्ता करात सवलत

ओल्या कच-यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प उभारणार्‍या गृहनिर्माण संकुलांना मालमत्ता करात विविध अटींसापेक्ष कमाल अशी सवलत मिळाली आहे. १५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्याच्या निर्णयानंतर याचा लाभ वांद्रे पूर्व -सांताक्रुझ पूर्व मधील सोसायटींनी मिळवला आहे. या पूर्व विभागातील सहा सोसायट्या दरमहा २५ हजार एवढ्या कर सवलतीला पात्र ठरल्या आहेत. महानगरपालिकेच्या ’एच पूर्व’ विभागातील वांद्रे पूर्व परिसरासह खार पूर्व, सांताक्रूझ पूर्व, कलीना, वाकोला, शासकीय वसाहत, कलानगर, विद्यापीठ परिसर, शिवाजी नगर, खेरवाडी आदी परिसरातील ’एमआयजी’ ग्रुप २,३ आणि ४ गोल्डन स्क्वेअर आर्किटेक्ट टेक्नीशियन या सहकारी सोसायट्यांसह या इमारतींमधून दररोज सरासरी १ हजार २०० किलो एवढ्या प्रमाणात कचरा तयार होतो.

सर्व सोसायटींमधून १२०० किलो ओल्या व सुक्या कचर्‍याची विल्हेवाट

यामध्ये १ हजार किलो ओला कचरा व २०० किलो सुक्या कच-याचा समावेश आहे. या सर्व कच-याची विल्हेवाट आता इमारतींच्या स्तरावर यथायोग्य प्रकारे लावली जात आहे. या अंतर्गत ओल्या कच-यावर पर्यावरणपूरक पद्धतीने प्रक्रिया करुन त्याचे सेंद्रीय खतात रुपांतर करण्याचा प्रकल्प सहाही इमारतींच्या परिसरात उभारण्यात आलेला आहे. तर सुक्या कचर्‍याचे वर्गीकरण करुन त्याची विल्हेवाट इमारतींच्याच स्तरावर केली जात आहे. यामुळे विभागातून डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येणार्‍या एकूण दैनंदिन कच-यापैंकी दररोज सर्व सोसायटींमधून सुमारे १ हजार २०० किलो एवढी घट झाली आहे.

त्यामुळे या सहाही इमारतींना महापालिकेच्या संबंधित नियम व अटींसापेक्षा या इमारतींना त्यांच्या मालमत्ता करात ५ टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिकेच्या ’एच/पूर्व’ विभाग कार्यालयाने घेतला आहे. यानुसार या इमारतींना आता दरमहा सुमारे २२ ते २६ हजार रुपयांची सवलत मालमत्ता करात मिळणार आहे. या सर्व इमारतींच्या प्रतिनिधींना परिमंडळ ३ चे उपायुक्त पराग मसुरकर यांच्या उपस्थितीत प्रभाग समितीचे अध्यक्ष शेखर वायंगणकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे.

First Published on: February 3, 2020 9:16 PM
Exit mobile version