रविवारपर्यंत मुंबईत जमावबंदी

रविवारपर्यंत मुंबईत जमावबंदी

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या वादग्रस्त अयोध्या खटल्याचा शनिवारी सकाळी निकाल लागला. या निकालानंतर मुंबईसह देशभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र निकालानंतर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच सोशल मीडियावर कुठेही आक्षेपार्ह आणि वादग्रस्त मेसेज व्हायरल झाले नाहीत. शहरात सर्वत्र शांतता ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे रविवारी सकाळपर्यंत ५ जणांपेक्षा जास्त जमावावर बंदी घालण्यात आली आहे.

अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात विशेषत: दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेशात घातपात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. याबाबत गुप्तचर विभागाने सर्वच प्रमुख शहरांना सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यामुळे निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह आणि वादग्रस्त मॅसेज व्हायरल होऊ नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती. मात्र शनिवारी सकाळी निकालाला सुरुवात झाली, त्यानंतर दिवसभरात शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. उलट सर्वच स्तरातून तसेच राजकीय पक्षांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर समाधान व्यक्त करत निर्णयाचे स्वागत केले.

असे जरी असले तरी मुंबईत जमावबंदी रविवारी सकाळपर्यंत कायम राहाणार आहे. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लघंन करणार्‍याविरुद्ध सक्त कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र मुंबईकरांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडले, तणाव निर्माण होईल असे कोणतेही कृत्य केले नाही. त्यामुळे पोलिसांना कुठेही हस्तक्षेप करावा लागलाच नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

First Published on: November 10, 2019 6:51 AM
Exit mobile version