नोकरी करण्यासाठी सैन्यात येऊ नका -लष्करप्रमुख बिपिन रावत

नोकरी करण्यासाठी सैन्यात येऊ नका -लष्करप्रमुख बिपिन रावत

लष्करप्रमुख बिपिन रावत

सैन्य म्हणजे फक्त नोकरी मिळवण्याचे साधन नाही. फक्त नोकरी पाहिजे म्हणून सैन्यात येणार असाल तर येऊ नका. नोकरीसाठी रेल्वे किंवा इतर ठिकाणी जा, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले आहे. युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ खडकी येथील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अ‍ॅण्ड सेंटर (बॉम्बे सॅपर्स) मधील कार्यक्रमात ते बोलत होते.

मागील काही दिवसांपासून देशातील तरुण सैन्याकडे नोकरीचे साधन म्हणून पाहत आहेत. पण सैन्य म्हणजे फक्त नोकरी मिळवण्याचे साधन नाही. जर तुम्हाला सैन्यात सहभागी व्हायचे असेल, तर शारिरिक तंदुरुस्ती दाखवावी लागेल. कठीण परिस्थितीचा सामना करण्याची तयारी पाहिजे. फक्त नोकरी पाहिजे म्हणून सैन्यात येणार असला तर येऊ नका. त्याकरिता तुम्ही रेल्वेत जा अथवा इतर ठिकाणी जा, असे मत बिपिन रावत यांनी मांडले.

सैन्यात नव्याने दाखल झालेल्या सैनिकांना संबोधताना ते म्हणाले, की युद्धात लढत असताना शारीरिक अपंगत्व आलेल्या जवानांना मदत करण्याची जबाबदारी आमची आहे. मात्र, काही जण तैनाती वेळी ताणतणाव, उच्च रक्तदाब, मधुमेह अशी कारणे देतात. असे मानसिक अपंगत्व असेल, तर त्यांना अपंग जवानांची कामगिरी पाहून शरम वाटली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. युद्धात अपंगत्व आलेले सैनिक कशाप्रकारे आपले आयुष्य जगत आहेत, याची माहिती घेण्यासाठी सैन्यातील काही अधिकार्‍यांची नेमणूक केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. हे सर्व देशभरात जाऊन अपंग सैनिकांची माहिती घेणार आहेत. ज्यांना मदतीची आवश्यकता आहे त्यांना मदत दिली जाणार आहे.

First Published on: December 14, 2018 4:56 AM
Exit mobile version