सीएए कायदा भाजपासाठी लागू होत नाही का? नाना पटोले यांचा सवाल 

सीएए कायदा भाजपासाठी लागू होत नाही का? नाना पटोले यांचा सवाल 

भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते गोमांस निर्यात करताना पकडले गेले, तर काही कार्यकर्ते हे पाकिस्तानी आयएसआयचे एजंट म्हणून काम करताना पकडले गेले आहेत. भाजपाने आता या पुढे जाऊन एका बांगलादेशी नागरिकालाच मुंबईत अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी केल्याचे उघड झाले आहे. सीएए कायद्याचा धाक दाखवणाऱ्या भाजपासाठी हा कायदा लागू होत नाही का? त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का? या प्रश्नांची उत्तरे देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाने दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विलेपार्ले येथे आयोजित गुजराती समाज मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सिंग सप्रा, गुजराती सेलचे भरत पारेख आदी उपस्थित होते.

देशात लोकशाही नाही का?

भाजप नेहमीच दुसऱ्यांना राष्ट्रप्रेमाचे धडे देत असतो. मात्र, त्यांनी रुबल शेख या बांगलादेशी नागरिकाला उत्तर मुंबईचा पदाधिकारी केले आहे. भाजपाचा पदाधिकारी झाल्यानंतर तो बांगलादेशी रुबल शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सीएए कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार आहे का? देशात लोकशाही नाही का? याची उत्तरे भाजपाला द्यावी लागतील, असेही नाना पटोले म्हणाले.

‘हम दो हमारे दो’ यांचेच सरकार 

पेट्रोल डिझेलच्या दर वाढीवरूनही पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. इंधनाच्या किमती सरकारच्या हातात नाहीत, असे पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान यांनीच राज्यसभेत जाहीरपणे कबुल केले आहे. हे सरकार फक्त ‘हम दो हमारे दो’ यांचेच आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली.

First Published on: February 20, 2021 10:04 PM
Exit mobile version