चैत्यभूमीवर उसळला भीमसागर…

चैत्यभूमीवर उसळला भीमसागर…

लाखो अनुयायांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

उत्साहाच्या रांगेचे सुनियोजन

पोलिसांकडून ठिकठिकाणी अनुयायांना चैत्यभूमीकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत होते. चैत्यभूमीकडे जाणार्‍या प्रत्येक सिग्नलवर अनुयायांना मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून थांबवण्यात येत होते. त्यामुळे प्रत्येक सिग्नलवर प्रचंड गर्दी होत होती. त्यातच गाड्यांच्याही रांगा लागत होत्या. मोठ्या प्रमाणात येणारे अनुयायी व वाहने यामुळे पोलिसांची तारांबळ उडत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दोन दिवस अगोदरपासूनच सुरू झालेली रांग शुक्रवारी वरळीपर्यंत गेली. त्यामुळे अनुयायांना अभिवादनासाठी तब्बल आठ ते नऊ तास रांगेत उभे राहावे लागत होते. परंतु, पोलीस व समता सैनिक दलाकडून गर्दीचे व्यवस्थित नियोजन करण्यात येत असल्याने रांगेत उभे असलेल्या अनुयायांना फारसा त्रास सहन करावा लागत नव्हता. चैत्यभूमीकडे जाणार्‍या रस्त्यांवर सामाजिक संस्था व संघटनांकडून अनुयायांसाठी जेवणाची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाहेर पडणार्‍या अनुयायांसाठी शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात जेवणाची, पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

प्रतिमा आतही आणि बाहेरही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर विश्रांतीसाठी अनुयायी शिवाजी पार्कमध्ये येत होते. शिवाजी पार्कमध्येही उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी अनुयायांमध्ये चढाओढ लागली होती. तसेच, शिवाजी पार्कमध्ये उभारलेल्या विविध स्टॉल्सवरही मोठ्या प्रमाणात अनुयायांकडून गर्दी करण्यात येत होती. विशेषत: पुस्तकांच्या स्टॉल्ससमोर अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. त्यानंतर बाबासाहेब, बुद्ध यांच्या मोठ्या प्रतिमा विकत घेण्याकडे अधिक कल दिसून येत होता. लहान मुले लॉकेट, किचेन व टी-शर्ट घेण्यासाठी हट्ट करत होती.

राज्यपाल, मुख्यमंत्री नतमस्तक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल ,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

इथेही व्हीआयपींमुळे अनुयायी ताटकळले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांचे नेते, रिपब्लिकन पक्षासह राज्यातील विविध पक्षांचे नेते, आमदार, खासदार, नगरसेवक, प्रदेशाध्यक्ष, साहित्यिक, डॉक्टर अशा विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती येतात. मात्र, महत्त्वाच्या व्यक्तींसोबत 25 ते 30 कार्यकर्ते असतात. त्यामुळे प्रत्येक व्हीआयपी व्यक्तीच्या वेळी सर्वसामान्य अनुयायांची रांग 15 ते 20 मिनिटे थांबवावी लागते. त्यामुळे देशभरातून आलेल्या सर्वसामान्य अनुयायांना ताटकळावे लागत होते.

मुंबईत ‘ड्राय डे’

६ डिसेंबर रोजी ‘ड्राय डे’ घोषित करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे मुंबई अध्यक्ष जनार्दन कोंडविलकर यांनी केली होती. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी मुंबईत ‘ड्राय डे’घोषित केला होता.

‘भारतीय संविधान’ अनुयायांसाठी जीवनग्रंथ

सर्वाधिक खरेदी

शिवाजी पार्क, दादर, चैत्यभूमी येथे उभारण्यात आलेल्या प्रत्येक पुस्तकांच्या स्टॉलवर भारतीय संविधान पुस्तकाची खरेदी केली जात होती. त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गौरव गाथा, मनुस्मृतीची बुद्धिवादी समीक्षा या पुस्तकांची विक्री होत होती. यासह नववर्षांची दिनदर्शिका विक्री केली जात

टॅटूला तरुणाईची पसंती

दादर स्थानकाकडून चैत्यभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टॅट्टू काढणार्‍यांनी आपले स्टॉल लावले होते. यामध्ये आपले नाव कोरून घेण्याबरोबर ‘जय भीम’, बुद्धांचे चित्र कोरून घेण्याकडे तरुणांचा कल अधिक होता, अशी माहिती टॅटू कोरणार्‍यांनी दिली. टॅटू कोरण्यासाठी एका अक्षराला 20 रुपये तर चित्र कोरण्यासाठी 150 ते 200 रुपये शुल्क आकारण्यात येत होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करत चैत्यभूमीकडे चाललेल्या अनुयायांचा रस्त्यावरील गर्दीचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करण्याकडे कल अधिक होता. गर्दीमध्ये जयघोष करण्यासाठी हात वर येण्याबरोबरच अनेक हातांमध्ये मोबाईल दिसत होते.

30 लाखांचे नवीन चलन वितरित

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे अनेक स्टॉल लागलेले होते त्यातील सर्वात महत्त्वाचा स्टॉल म्हणजे भारतीय रिझर्व बँकेचा होता. आरबीआयच्या स्टॉलवरून अनुयायांना वित्तीय साक्षरतेवर जनजागृती करण्यात येत होती. तसेच नकली चलन कसे ओळखायचे, बँक खाते कसे सुरू करायचे,अशी अनेक माहिती या स्टॉलवरुन अनुयायांना देण्यात येत होती. भारतीय रिझर्व बँकेकडून अनुयायांना जुन्या चलनासोबत नवीन चलन सुध्दा देण्यात येेत होते. अनुयांयाकडे चिल्लर नसल्यामुळे आयसीआयसीआय बँककडून चिल्लरचे वितरण करण्यात येत होते. दुपारपर्यंत तब्बल 20 लाखांच्या जुन्या, फाटलेल्या नोटा अनुयायांकडून घेऊन त्याऐवजी नवीन चलन अनुयायांना देण्यात येत होते. रात्री उशिरापर्यंत सुमारे 30 लाखांचे नवीन चलन वितरित होण्यार असल्याची माहिती भारतीय रिझर्व बँकेच्या कॅश विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक ज्ञानेश्वर खांबे यांनी दिली आहे.

बेस्टचा बेस्ट उपक्रम

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि पविहv उपक्रमकडून दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे चहा- नाश्ता आणि वैद्यकीय तपासणीचे स्टॉल लावण्यात येतात. मात्र, यंदा बेस्टकडून याशिवाय बाबासाहेबांचे विचार अनुयायांपर्यंत पोहचवण्यासाठी बाबासाहेबांची पुस्तके नि:शुल्क वितरित करण्यात येत होती. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांचे अनुयायी पुस्तकांची खरेदी करताना दिसत होते. इतकेच नव्हे तर बेस्टच्या आरोग्य विभागाकडून सुध्दा तंबाखू सोडण्यासाठी अनुयायांना समुपदेशन करण्यात येत होते.

नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे…

काल मोठ्या उत्साहात पार पडलेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात असताना डिक्की अर्थात दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्यावतीने चैत्यभूमीवर आलेल्या भाविकांना अन्नदान तसेच पाणी वाटप केले गेलेे. महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या दलित तरुणांना डिक्कीकरवी एक फळझाडाचे रोपटे देऊन त्यांना ‘आम्ही नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे होऊ!’ अशा आशयाची शपथ देण्यात आली.यावेळी डिक्कीच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा चित्रा उबाळे, मुंबई विभाग अध्यक्ष अरुण धनेश्वर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

‘आम्ही आंबेडकरवादी’ची स्वच्छता मोहीम

‘आम्ही आंबेडकरवादी’ या मोहिमेंतर्गत हातात झाडू व पिशव्या घेऊन रस्ते साफ करण्यास सुरुवात केल्याची माहिती ‘आम्ही आंबेडकरवादी’चे कार्यकर्ते विशाल गायकवाड यांनी दिली. सकाळी सात वाजल्यापासून हे कार्यकर्ते काम करत आहेत. या संस्थेचे जवळपास एक हजारांहून अधिक कार्यकर्ते शिवाजी पार्क व चैत्यभूमी परिसरात सज्ज होते. या तरुणांनी कचरा जमा करण्याबरोबरच अनुयायांना मार्गदर्शनही केले.

शांत चैत्यभूमी अभियान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन गांभीर्याने पाळला जावा, म्हणून गेल्या चार वर्षांपासून शांत चैत्यभूमी अभियान राबविले जात आहे. सोशल एज्युकेशन मूव्हमेंट (सेम) या संस्थेमार्फत हे अभियान ४ ते ६ डिसेंबरदरम्यान राबविले जाते. या अभियानात महिला कार्यकर्त्या हाती बॅनर घेऊन, संपूर्ण शिवाजी पार्क मैदान आणि चैत्यभूमी नजीकच्या परिसरात शांतपणे महामानवाला अभिवादन करण्याचे आवाहन करतात.याबाबत संस्थेचे राहुल ढोले म्हणाले की, ६ डिसेंबर हा दु:खाचा दिवस असून, त्या दिवशी डीजे किंवा अन्य प्रकारच्या वाद्यांची गरज नाही. त्यामुळे या दिवशी चैत्यभूमी व शिवाजी पार्क मैदानावर सीडी विक्रेत्यांना हेड फोन्स लावून विक्री करण्याचा पर्याय संस्था सुचविते. कलाकारांनीही भोंग्याचा वापर न करता गांभीर्याला बाधा होणार नाही, अशा पद्धतीने कलाविष्कार सादर करण्याचे आवाहन संस्था करत आहे. सतत तीन दिवस प्रभातफेरी काढून संस्था परिसरात शांतता राखण्याबाबत जनजागृती करत आहे.

दादर रेल्वे स्थानकाला बाबासाहेबांचे नाव द्या

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीत महापरिनिर्वाण झाल्यानंतर मुंबईतील दादर चौपाटी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आंबेडकर यांचे निवासस्थान दादर येथे आहे. आंबेडकर, अनुयायींचा दादरशी निकटचा आणि भावनिक संबंध आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दादर रेल्वेस्थानकाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस हे नाव देण्याचा आंबेडकरी जनतेचा मागणीकडे सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे महापरिनिर्वाण दिनी भीम आर्मीचे कोर कमिटी प्रमुख राजू झनके यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेबांच्या आठवणी संग्रहित छायाचित्रांद्वारे

डॉ. बाबासाहेब आंबेडरांच्या ६३ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांचे विचार, त्यांचे कार्य, सर्व दूरपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्नही विविध उपक्रमातून पालिकेतर्फे करण्यात येतो. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही बृहन्मुंबई महानगर पालिका जनसंपर्क विभागातर्फे छायाचित्र प्रदर्शन ठेवण्यात आले होते. येणार्‍या अनुयायांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. डॉ. बाबासाहेबांच्या संग्रहित छायाचित्रांचे हे प्रदर्शन बरेच बोलके होते. बाबासाहेबांची भूमिका, त्यांची चळवळ ही सर्व छायाचित्रे म्हणजे अनुयायांच्य विचारांना चालना देणार्‍या या प्रदर्शनात १९२७ मध्ये महड येथील चवदार तळ्याचे सहकार्‍यांसोबत पाणी प्राशन करून केलेला सत्याग्रह, लंडन विद्यापीठाचा ग्रेजाईन या न्यायशास्त्राच्या संस्थेतून बॅरिस्टर ही पदवी अशा एकूणच बाबासाहेबांच्या जीवनप्रवासाबद्दल संग्रहित छायाचित्रांचे प्रदर्शन पालिकेमार्फत आयोजित केले होते.

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचा अनोखा प्रयोग

दैव आणि देवावर विसंबून राहू नका. अंधश्रध्दा व बुवाबाजीचा विरोध करा. भविष्य, मुहूर्त, चमत्कारांवर विश्वास ठेवू नका ही डॉ. बाबासाहेबांची शिकवण. याचाच आधार घेत शुक्रवारी ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीद्वारे जनजागृतीचा अनोखा प्रयोग शिवाजी पार्क येथे अनुयायांना अनुभवायला मिळाला. गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी चैत्यभूमीवर आले होते. याचे औचित्य साधत येणार्‍या अनुयायांना विज्ञानाचा आधार घेत प्रत्यक्ष प्रयोग समितीद्वारे करुन दाखवण्यात आले.

First Published on: December 7, 2019 5:46 AM
Exit mobile version