Dr Suvarna Waje : धक्कादायक! डॉ. सुवर्णा वाजेंचा पतीनेच कट रचून केला घात

Dr Suvarna Waje : धक्कादायक! डॉ. सुवर्णा वाजेंचा पतीनेच कट रचून केला घात

डॉ. सुवर्णा वाजे मृत्यूचे गूढ उकल करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना दहाव्या दिवशी यश आले आहे. डॉ. वाजे यांचा खून संशयित मुख्य आरोपी पती संदिप वाजे याने कट रचून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. कारमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेला सांगाडा डॉ. सुवर्णा वाजे यांचाच असल्याचा अहवालसुद्धा पोलिसांना फॉरेन्सिक लॅबकडून प्राप्त झाला आहे. पोलिसांनी वाडीवर्र्‍हे पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला असून, पती संदिप वाजे यास अटक केली आहे. (Dr Suvarna Waje murder case Husband detected as main culprit Nashik police arrested main suspect)

नाशिक महापालिकेच्या मोरवाडीतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा संदीप वाजे (३८, रा. कर्मयोगी नगर, गोविंद नगरजवळ, नाशिक) या बेपत्ता झाल्याने पतीने २५ जानेवारी रोजी अंबड पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, त्याच दिवशी वाडीवर्‍हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगडनगरजवळ रस्त्याच्या कडेला कारमध्ये जळालेल्या अवस्थेत महिलेचा सांगाडा आढळला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी पती संदिप वाजे याच्या मुसक्या आवळल्या.

अंबड पोलिसांनी मिसिंगच्या तक्रारीनुसार डॉ. वाजे यांचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाआधारे शोध सुरु केला आहे. तर नाशिक ग्रामीण पोलीस विल्होळीनजीक घटना घडल्याने या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत. शिवाय, फॉरेन्सिक लॅबकडून डीएनएसह मिळालेल्या नमुन्यानुसार तपासणी केली गेली. घटनास्थळी मिळून आलेली मानवी हाडे डॉ. वाजे यांचीच आहे की आणखी कोणाची आहेत, हे फॉरेन्सिक अहवालातून तपासण्यात आले.

फॉरेन्सिक लॅबने घेतलेले नमुने

जळालेला सांगाडा महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, बेपत्ता महिला डॉ. वाजे आहेत का याची शहानिशा करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमधील डीएनए विभागात चाचणी करण्यासाठी पथकाने २८ जानेवारी रोजी मृत महिलेच्या हाडांच्या नमुन्यांसह कुटुंबियांचे रक्ताचे नमुने घेतले होते. डीएनए पृथकरण करुन विश्लेषण केले गेले. त्यात काही त्रुटी आढळून आल्यास पुन्हा नव्याने नमुने घेतले जाणार होते.

काय होता नेमका सस्पेन्स ?

डॉ. सुवर्णा वाजे यांनी मोरवाडी रुग्णालयात मंगळवारी सायंकाळपर्यंत ओपीडी मध्ये काम केले. दरम्यान, त्यांनी पतीला मेसेज पाठवून रात्री ११ वाजेपर्यंत मिटींग असून, घरी यायला उशीर होणार असल्याचे कळवले होते. रात्री त्या घरी परत न आल्याने त्यांचे पती व वडिलांनी महापालिकेच्या अधिकारी व रुग्णालयात संपर्क साधला असता कोणतीही मिटींग नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर डॉ.वाजे यांचा शोध सुरु झाला.

कुटुंबियांनी अंबड पोलीस ठाण्यात रात्री ११.३० वा. मिसिंगची तक्रार दिली. दरम्यान मुंबई महामार्गालगत जळालेल्या गाडीची माहिती मिळाल्याने सर्वांना धक्का बसला. सायंकाळी महापालिकेत कोणतीही बैठक नसताना त्यांचे पतीला मेसेज पाठवून उशीरा येत असल्याचे कळवले. त्यानंतर त्यांची गाडी व त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्यामुळे मृत्यूचे गूढ निर्माण झाले आहे.


 

First Published on: February 3, 2022 6:11 PM
Exit mobile version