टिटवाळ्यात आठ ठिकाणी मादक पदार्थ सेवन

टिटवाळ्यात आठ ठिकाणी मादक पदार्थ सेवन

टिटवाळा । कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मांडा टिटवाळा येथील आठ प्रमुख ठिकाणी अल्पवयीन तरुण-तरुणी मद्यपी आणि नशा करणारे टोळके बिनधास्तपणे गैरवर्तणूक करीत आहेत. पोलीस प्रशासनाच्या धाक उरला नसल्याने या प्रकारात वाढ होत असल्याने याला आळा घालण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस इन्स्पेक्टर जितेंद्र ठाकूर यांना निवेदन देऊन केली आहे. टिटवाळ्यात अष्टविनायक गणेश मंदिरांपैकी एक मंदिर अस्तित्वात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. अंगारकी आणि चतुर्थीला भक्तगणांची रेलचेल हजारोंच्या संख्येत जात असते. नवसाला पावणारा गणपती असल्याने राज्यातून भाविकांची वर्दळ येथे कायम असते. यामुळे मांडा टिटवाळा शहर झपाट्याने विकसित झाले आहे.

वसाहती वाढल्याने नागरीकरणही वाढीस लागले आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बेकायदा व्यावसायांनी डोके वर काढले असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न एरणीवर आला आहे. मांडा टिटवाळा शहरातील गजबजलेली ठिकाणे म्हणून नावारूपास आलेल्या या ठिकाणी हैदोस घालण्याच्या प्रकारात वाढ होताना दिसून येत आहे. सार्वजनिक उद्यानात तरुण-तरुणी गैरवर्तन करीत आहेत. अमली पदार्थांचे सेवन तरुण पीडित करीत असल्याने व्यसनाधीन बनत चालण्याचे बोलले जात आहे. पोलिसांची ग्रस्त, फेरफटका होत नसल्याने शहरातील मोक्याच्या ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत बाळासाहेबांची शिवसेना कल्याण शहर उपप्रमुख विजय देशकर, शाखाप्रमुख सिद्धांत कसबे, आनंद भोईर, अशोक चौरे, बबलेश पाटील, दिलीप राठोड तसेच महिला पदाधिकारी सुषमा शर्मा, प्रीती रामटेके ,नीता देशेकर ,कामिनी दास, अनिता वंजीवले आदींनी तालुका पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर जितेंद्र ठाकूर यांना निवेदन देत तरुण-तरुणी करीत असलेली गैरवर्तणूक खुलेआमपणे अमली पदार्थ सेवन आणि मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करून या संदर्भात एक हेल्पलाइन नंबर सुरू करण्याची मागणी केली आहे.

या ८ ठिकाणीं होतात गैरप्रकार

मांडा टिटवाळयातील महत्वाची ठिकाणे समजले जाणाऱ्या परिसरात गैरकृत्यांना ऊत आला असून यात प्रामुख्याने बालोद्यान पार्क, स्टेशन समोरील मारुती मंदिराच्या मागील परिसर, इंदिरा नगर मार्गे, चार्मस हाईट रोड, स्मशानभूमी रोड ,टिटवाळा महोत्सव मैदान, रेजन्सी सर्वम, थारवाणी सिमेंट रोड, पंचवटी बिल्डिंग मागील परिसर व शिवमंदिर परिसर.

…. तर कारवाई करणार सीनियर इन्स्पेक्टर -जितेंद्र ठाकूर
कॉलेजमधील विद्यार्थी या ठिकाणी एकत्र येऊन संबंधित ठिकाणी बसत असतात. अश्लील कृत्य किंवा मादक पदार्थांचे सेवन करीत नसल्याचे कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर जितेंद्र ठाकूर यांनी आपल्या महानगर शी बोलताना सांगितले. याबाबत तपास करीत असे काही घडत असले तर निश्चित कारवाई केली जाईल असे सांगत बाल उद्यानात युवक वर्ग जर येत असेल तर त्यांना बसू दिले जाणार नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

First Published on: February 2, 2023 9:25 PM
Exit mobile version