औषध विक्रेत्यांचा संप मागे; ३१ मार्च पर्यंत औषध विक्रेत्यांची थकित रक्कम मिळणार

औषध विक्रेत्यांचा संप मागे; ३१ मार्च पर्यंत औषध विक्रेत्यांची थकित रक्कम मिळणार

औषध

सरकारी हॉस्पिटलमध्ये औषध पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांनी गेल्या २० दिवसांपासून औषध पुरवठा थांबवला होता. पण, तो आता पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. कारण, सरकारी हॉस्पिटलमधील औषधांच्या थकीत बिलासाठी हॉस्पिटलमध्ये औषध पुरवठा न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, थकीत बिलांची संपूर्ण रक्कम देण्याचं सरकारकडून कबूल करण्यात आलं असून लवकरच ही रक्कम देण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या आश्वासनानंतर ऑल ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनला ३१ मार्चपर्यंच त्यांची जवळपास ६० ते ७० टक्के थकबाकी देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. तसेच उर्वरित रक्कम ३० एप्रिल पर्यंत देणार असल्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे.

६० कोटी रूपये थकबाकी

फाउंडेशनच्या माहितीनुसार; राज्यातील सरकारी दवाखान्यांना औषध पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांचे जवळपास मागील पाच वर्षांचे मिळून तब्बल ६० कोटी रूपये थकबाकी आहे. याबाबत वेळोवेळी संस्था पाठपुरवठा करून देखील केवळ तोंडी आश्वासनं देण्यात आली होती. त्यामुळे, पुरवठादारांनी जोपर्यंत पैसे देण्याबाबतचे ठोस लेखी आश्वासन देण्यात येत नाही तोपर्यंत सरकारी रुग्णालयांना औषध पुरवठा करणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळेच, मागील २० दिवसांपासून पुरवठादारांनी हॉस्पिटलचा औषध पुरवठा बंद केला होता. अखेर याची तत्काळ दखल घेत अमित देशमुख यांनी ३१ मार्च पर्यंत ६९ ते ७० टक्के पैसे देण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी औषधांच्या थकीत बिलांसंबंधी सरकारी हॉस्पिटलमध्ये लेखा परीक्षण करण्यात आले होते. त्यानुसार औषध पुरवठादारांना अर्थसंकल्पानंतर मिळणाऱ्या निधीतून ६० कोटी ही रक्कम देण्याचे आश्वासन देखील देण्यात आलं होतं. पण, आता थकीत रक्कम मिळण्याची ३१ मार्चही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे, जो पुरवठा बंद केला होता आता पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचंही पांडे यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा – इराणवरुन नाशिकला आलेल्या रुग्णाचा रिपोर्ट निगेटीव्ह


First Published on: March 3, 2020 8:22 PM
Exit mobile version