मालेगावातील नशेचे रॅकेट; कुत्ता गोळी पुरवठादार जाळ्यात

मालेगावातील नशेचे रॅकेट; कुत्ता गोळी पुरवठादार जाळ्यात

मालेगावात नशेसाठी वापरल्या जाणार्‍या कुत्ता गोळींचा मोठा साठा धुळ्याहून विक्रीसाठी घेवून येणार्‍या पुरवठादाराला नाशिक ग्रामीण पोलिसांनी रविवारी (दि.२६) सापळा रचून अटक केली. यानिमित्ताने अनेक वर्षांपासून सुरू असलेला नशेचे रॅकेट आजही कायम असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील झोडगे शिवारात पोलिसांनी ही कारवाई केली. मुजम्मिल अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मालेगाव शहरातील अनेक तरुण नशेसाठी कुत्ता गोळीचा वापर करत असल्याचे वारंवार पुढे आले आहे. त्यामुळेच या गोळीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. अल्प्राझोलम नावाची ही गोळी मानसिक विकार आणि वेदनामुक्तीसाठी उपचारांचा भाग म्हणून वापरली जात असली तरीही, मालेगावात मात्र या गोळीचा वापर नशेसाठी होतो आहे. या गोळीचे रॅकेट गुजरातपासून धुळे, मालेगाव, नाशिक ते मुंबईपर्यंत पसरलेले आहे. विशेष म्हणजे मालेगावातील गुन्हेगारी जगतात या गोळीचा बोलबाला आहे. कुत्ता गोळी पुरवठादार संशयित अन्सारी हा दुचाकीवरून रविवारी धुळ्याहून नाशिकला जाणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने नाशिक व धुळे जिल्ह्याच्या सीमेवरील झोडगे शिवारात सापळा रचला होता. संशयित झोडगे शिवारात येताच पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवला. त्याच्याकडे गोळ्या असल्याची खात्री होताच पोलिसांनी २८ हजार ५०० रुपये किंमतीच्या १२ हजार कुत्ता गोळ्या जप्त केल्या.

गुजरात ते मुंबई कनेक्शन

सहा महिन्यांपूर्वीदेखील धुळ्यात कुत्ता गोळीचा मोठा साठा सापडला होता. या गोळ्या गुजरात येथून धुळेमार्गे मालेगाव व मुंबईच्या दिशेने जात असल्याचे वारंवार झालेल्या कारवाईतून पुढे आले आहे. मात्र, त्यानंतरही पोलिसांना हे रॅकेट उद्ध्वस्त करता आलेले नाही. हीच बाब या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

First Published on: July 27, 2020 6:00 AM
Exit mobile version