पावसाचा जोर नसल्याने भातसा धरणातील पाणीसाठा निम्यावरच !

पावसाचा जोर नसल्याने भातसा धरणातील पाणीसाठा निम्यावरच !

भातसा धरण

मुंबईसह महानगरासह ठाणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ठाणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या शहापूर तालुक्यातील भातसा धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून येथे पावसाचा जोर वाढलेला आहे. परंतु, धरणातील पाणी साठ्यात मात्र पाहिजे तशी वाढ झालेली दिसून येत नाही. धरणातील पाण्याची पातळी अद्यापही निम्यावरच दिसून येते आहे.

यंदा धरणक्षेत्रात समाधानकारक असा पाऊस नसल्याने पावसाळ्यात धरणांमध्ये आजमितीला ७० टक्के एवढा देखील पाणीसाठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे यंदा धरणांच्या पाणीसाठ्याविषयी कमालीची चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिना उजाडला तरी अद्यापही पाऊस पाहिजे तसा पडत नसल्याने परिणामी यंदा भातसा धरण पूर्णपणे भरुन वाहणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर यंदा पावसाळ्यात धरण भरले नाही तर जलसंपदा विभागाला पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागेल अशी परिस्थिती दिसत आहे. धरणातून पाणीपुरवठा होणार्‍या शहरांना याचे परिणाम ऊन्हाळ्यात सहन करावे लागतील. या शहरांना पुढील काळात पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागेल, असे चित्र दिसून येत आहे.

गुरुवारी भातसा धरणाची पाण्याची पातळी पाहता सध्यास्थितीत धरणाची पाण्याची पातळी पाणी पातळी :- १२५ .३५ मीटर इतकी आहे तर धरणात उपयुक्त पाणीसाठा ५४७ .६९१ दशलक्ष घनमीटर आहे तर धरणात एकूण पाण्याचा साठा ५८१.६९१ दशलक्ष सध्या धरणात ५८.१४ टक्के पाण्याचा साठा असून गुरुवारी भातसा धरण क्षेत्रासह एकूण ५६.०० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर तालुक्यात एकूण पाऊस १२३४.०० मि.मी. एवढा पाऊस पडला आहे. तालुक्यातील भातसा धरणासारखीच तानसा, मोडकसागर ,मध्यवैतरणा या धरणांची स्थिती पण अशीच दिसत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडक सागर धरण गेल्या वर्षी आजच्या दिवशी १०० टक्के भरले होते. पण आज या धरणात फक्त ४० टक्केच पाणीसाठा आहे. तानसा धरणात ४८ टक्के तर मध्यवैतरणा धरणात आतापर्यंत ३३.८६ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो ९३.९४ टक्के इतका होता. आज या धरणात पुरेसा पाणीसाठा नाही. धरणांतील या चिंताजनक पाणी साठ्यामुळे काळजी वाढली आहे. आगामी दिवसात धरणांच्या या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अन्यथा पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.

First Published on: August 6, 2020 9:00 PM
Exit mobile version