‘इट राईट चॅलेंज’ देणार अन्नसुरक्षा

‘इट राईट चॅलेंज’ देणार अन्नसुरक्षा

राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) ‘इट राईट चॅलेंज’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान पाच टप्प्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहीमेंतर्गत एफडीएकडून विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून राबवण्यात येणार्‍या ‘इट राईट चॅलेंज’मध्ये राज्यातील १७ जिल्हे सहभागी झाले आहेत. सहभागी जिल्ह्यांतील एफडीए कार्यालयांना टास्क देण्यात आले आहेत. हे टास्क पाच टप्प्यांमध्ये विभागले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये अन्न विक्री करणार्‍या प्रत्येक दुकान, हॉटेलचा परवाना तपासणे, दुकानातील दुध, मसाले, भाज्या, फळे, रवा, पीठ, मैदा, तेल यांचे जवळपास १२०० नमूने घेऊन त्यांची तपासणी करणे, एफडीएतील अधिकार्‍यांना प्रशिक्षण देणे त्याचबरोबर खाद्यपदार्थांच्या चाचण्यांबाबत ग्राहकांना नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

दुसर्‍या टप्प्यामध्ये २००० फेरीवाल्यांना प्रशिक्षण, हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे, ढाबा, बेकरी, मिठाई शॉप, मटण-चिकन शॉप अशा १००० दुकानांची पाहणी करून त्यांना स्वच्छता क्रमांक देणे, इस्कॉन, स्वामी नारायण मंदिर, सिद्धी विनायक मंदिर, गुरुद्वारा यांच्यामार्फत १० ठिकाणी फेरीवाले, भाजी मार्केट यांना प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र देणे, ‘इट राईट चॅलेंज’अंतर्गत आशा वर्कर, अंगणवाडी आणि आरोग्य सेविकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तिसर्‍या टप्प्यात शाळा, हॉस्पिटल आणि खासगी कार्यालयात ‘इट राईट चॅलेंज’ राबवण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील १०० शाळा, १२ खासगी हॉस्पिटल व कार्यालयांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये या मोहीमेत सर्वसामान्यांचा समावेश करण्यात येणार आहे. चित्रपटगृहे, व्हिडिओ आणि पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त शशिकांत केंकरे यांनी दिली.

खाद्य सुरक्षा उपक्रमात मुंबई विभाग अव्वल

ऑगस्टमध्ये पावसाळ्यातील खाद्य सुरक्षा उपक्रम देशातील ३० शहरांमध्ये राबवण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातून मुंबई, पुणे नागपूर या तीन शहरांचा समावेश होता. यात मुंबई विभागाने ४५० गुण मिळवून देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण आणि नेट प्रो फॅन यांच्यामार्फत मुंबई विभागाला गौरवण्यात आले.

First Published on: October 7, 2020 3:34 PM
Exit mobile version