मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने शंभर कोटी वसुली प्रकरणात अटक केली आहे. (ED arrested Former Home Minister Anil Deshmukh) अनिल देशमुख यांना अखेर रात्री १२.३० वाजता अटक दाखवण्यात आली. तब्बल १२ तासाच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मंगळवारी त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ईडीने या अटकेची माहिती रात्री उशिरा दिली आहे. पाच समन्स पाठवल्यानंतर अनिल देशमुख सोमवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात वकीलासह हजर झाले होते.

अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची बेकायदेशीर वसुली केल्याचा आरोप आहे. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेखी पत्र देऊन हे आरोप केले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल करून अनिल देशमुख यांना ५ जून रोजी पहिले समन्स पाठवले होते. मात्र त्यांनी वकिलामार्फत कारण  पुढे करून ईडीकडून वेळ मागितला होता. मात्र देशमुख हे वेळ देऊन ही ईडीच्या चौकशीला हजर झाले नव्हते. दरम्यान ईडीने एका पाठोपाठ एक असे चार महिन्यात पाच समन्स देशमुख यांना पाठवले होते. अखेर १ नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यलयात सकाळी ११ वाजता दाखल झाले असता तब्बल १२ तास चौकशी नंतर त्यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. मंगळवारी त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात ईडीकडून ही तिसरी अटक असून यापूर्वी देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव  पालांडे आणि खासगी सचिव कुंदन शिंदेला या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर या गुन्ह्याचा तपास ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार हे करीत होते, मात्र त्यांना बढती देऊन त्यांची केंद्रात बदली करण्यात आली होती. अनिल देशमुख हे चौकशीसाठी ईडी कार्यलायत हजर झाले असता सत्यव्रत कुमार यांना मुंबईत तात्काळ बोलवून घेण्यात आले होते. ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार हे सायंकाळी ७ वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात हजर झाले असता अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई सुरू करण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने बरेच पुरावे गोळा केले असून या पुराव्याच्या आधारे रात्री उशिरा १२ वाजता अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.

ईडीने मागील काही महिन्यात अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर छापेमारी केली होती, तसेच त्यांच्या पत्नी आणि मुलाला देखील ईडीने समन्स बजावले होते

दरम्यान, मागील चार महिन्यांपासून बेपत्ता असलेले अनिल देशमुख हे सोमवारी सकाळी अचानक ईडीच्या मुंबईतील कार्यालयात दाखल झाले. आपण ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सांगत ते मुंबईतील ईडीच्या कार्यालयात शिरले. त्यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल करत देशमुख यांनी आपली बाजू मांडली होती. त्यात ते म्हणतात, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. मी नैतिकतेला धरून चालणारा माणूस आहे. गेल्या ३० वर्षांत माझ्यावर एकही आरोप झाला नाही. मात्र, माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह आज कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला.

परमबीर सिंह भारत सोडून पळून गेल्याच्या बातम्या येत आहेत. माझ्यावर आरोप करणारी व्यक्तीच पळून गेली आहे. परमबीर यांच्यावर पोलीस खात्यातील अनेकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. सचिन वाझेने परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. याआधी तो तुरुंगात होता. मी गृहमंत्री असताना त्याला नोकरीतून काढण्याची प्रक्रिया सुरू केली, त्यामुळे त्याने माझ्यावर आरोप केले, असा दावाही देशमुख यांनी केला.

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुली संदर्भात आरोप केल्यानंतर देशमुख यांची ईडीमार्फत चौकशी सुरू करण्यात आली होती. मात्र, चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी अनिल देशमुख आणि कुटुंबीय अनेक महिन्यांपासून गायब होते. ईडीने देशमुख यांच्या निवासस्थानी चार ते पाच वेळा धाडी टाकल्या होत्या. त्यांच्या नागपूर, मुंबई आणि वर्ध्यातील घरी ईडीने छापेमारी करत कारवाई केली होती. याशिवाय कार्यालयात हजर राहण्याबाबत ईडीने अनेकदा समन्स बजावले होते. परंतु देशमुख यांनी समन्सला दाद दिली नव्हती. ईडीसमोर हजर न राहता देशमुख यांनी वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या दरम्यान ते गायब झाल्याची चर्चा होती.
या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचा निर्णय घेतला. तसा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला. परमबीर यांच्यासारख्या लोकांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप होत आहेत. माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात असून याचे, मला दुःख आहे, अशी खंतही देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

मला ईडीने समन्स बजावल्यानंतर मी ईडीला तपासात सहकार्य करत नसल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा मला ईडीचे समन्स आले तेव्हा मी त्यांना कळवले की माझी याचिका उच्च न्यायालयात आहे. त्याची सुनावणी चालू आहे. मी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये येईन, असेही देशमुख म्हणाले आहेत.

 

First Published on: November 2, 2021 1:19 AM
Exit mobile version