माथाडींना हक्काच्या घरांसाठी निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन

माथाडींना हक्काच्या घरांसाठी निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन

ठाणे : माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. माथाडी कामगारांचे अनेक रखडलेले प्रश्न येत्या काळात मार्गी लावण्यात येतील. माथाडी कामगारांना हक्काचे घर मिळावे, यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी मुंबई बँकेच्या मदतीने निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले.

माजी आमदार दिवंगत अण्णासाहेब पाटील यांच्या 89व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित माथाडी कामगार मेळावा आणि गुणवंत कामगार पुरस्कार, माथाडी भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगारमंत्री सुरेश खाडे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश शिंदे, माजी आमदार नरेंद्र पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक आदी उपस्थित होते.

मराठा समाजाला न्याय देण्यासाठी उपसमिती स्थापन झाली आहे. तसेच मराठा युवकांच्या शासकीय नोकरीत नियुक्तीसाठी अधिसंख्य पदे निर्माण केली असून नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे. मराठा समाजात नवउद्योजक तयार व्हावेत, यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ केली जाईल, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळ व सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजात नवीन उद्योजक तयार होण्यासाठी अनेक योजनांवर राज्य शासन काम करत आहे. महामंडळाची जबाबदारी पुन्हा एकदा माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर सोपविण्यात येईल.

राज्य शासनाने गेल्या अडीच महिन्यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्यात पोलीस भरती प्रक्रिया आणि 75 हजार रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राज्याच्या विकासासाठी केंद्र शासनही आपल्यामागे खंबीरपणे उभे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

निधी कमी पडू देणार नाही – फडणवीस
मागील 2014 ते 2019च्या काळात माथाडी कामगारांच्या अनेक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतले. अनेक प्रश्न सोडविले. या काळात स्व.अण्णासाहेब पाटील महामंडळाला पुनरुज्जीवित केले. त्यामाध्यमातून मागील काळात 50 हजार मराठा तरुणांना उद्योजक होण्याची संधी मिळाली, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

माथाडी कामगाराच्या घराचा प्रश्न सोडविणे कठीण होते. पण जास्तीचा एफएसआय देऊन तो प्रश्न मार्गी लावला. या पुढील काळातही यासाठी निधी कमी पडू देणार नाही. माथाडी कामगारांचे उर्वरित प्रश्न निश्चितपणे सोडवू. नाशिकच्या लेव्हीचा प्रश्नही बैठक घेऊन लवकरच सोडविण्यात येईल. माथाडी कामगारांच्या चळवळीच्या मागे आपण भक्कमपणे उभे आहोत. माथाडी कामगार संघटनामध्ये घुसलेल्या अपप्रवृत्ती विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

First Published on: September 25, 2022 2:39 PM
Exit mobile version