जनतेच्या हितासाठी नावीन्यपूर्ण आणि चांगले उपक्रम राबविण्याचा प्रयत्न : एकनाथ शिंदे

जनतेच्या हितासाठी नावीन्यपूर्ण आणि चांगले उपक्रम राबविण्याचा प्रयत्न : एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले. या ध्वजारोहणानंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी राज्याची सध्य परिस्थिती आणि आगामी काळात वाटचाल करण्यासंदर्भात भाष्य केले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करताना गतीमान व गुणवत्तापूर्ण कामे झाली पाहिजेत हे प्रशासनाला सांगितले आहे. तसेच, ‘राज्यातील जनतेच्या हितासाठी नावीन्यपूर्ण आणि चांगले उपक्रम राबविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत’, असे म्हटले. (Efforts to implement innovative and good activities for the benefit of the public CM Eknath Shinde)

‘सरकार सत्तेवर आल्यानंतर सातत्याने महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी केंद्राशी आम्ही बोलतो आहोत. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तसेच केंद्रातील इतर मंत्री महोदय यांनी राज्याच्या विकासाला काही कमी पडू दिले जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आमचा उत्साह वाढला आहे. केंद्राच्या योजनांची आणि कार्यक्रमांची राज्यात सर्वात चांगली अंमलबजावणी झाली पाहिजे, असे निर्देश आम्ही प्रशासनाला दिले आहेत’, असे त्यांनी सांगितले.

‘पीक पद्धतीत बदल विविधीकरण, सिंचन व्यवस्था बळकट करणे, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रीय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे यातून राज्यातील कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करणार आहोत. यासंदर्भात नुकतीच नीति आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राची भूमिका मी परखडपणे मांडली आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची चांगली अंमलबजावणी

राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची चांगली अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. ‘आमचे गुरुजी’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यात वर्गामध्ये शिक्षकांचे छायाचित्र लावण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना शिक्षकांची ओळख होईल. राज्यातील कोणतीच शाळा एक शिक्षक राहणार नाही, असे नियोजन आम्ही केले आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

शहरी भागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी

राज्यातील शहरी भागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी पीएम गती शक्ति मॉडेलचा उपयोग देखील आम्ही करणार आहोत. राज्यात ग्रीन फिल्ड शहरे निर्माण करण्यावर भर देत आहोत. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग विकासाचा महामार्ग ठरेल यात काही शंकाच नाही. येत्या काही दिवसांत या महामार्गाचा पहिला टप्पा कार्यान्वित होईल.

पाणी, घरे यांना प्राधान्य

पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जल जीवन मिशनसारख्या योजनेची ७५ टक्के अंमलबजावणी झाली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे बांधून आम्ही बेघरांना निवारा दिला आहे. पोलिसांच्या घरांसाठी गृह, नगरविकास, गृहनिर्माण, सिडको या सर्व विभागांनी समन्वयाने सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

कौशल्य विकासास प्राधान्य

राज्यात उद्योग- रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नुकतीच रतन टाटा व इतर उद्योजकांशी भेट घेऊन चर्चा केली आहे. कौशल्य विकासास प्राधान्य देणार असून त्याद्वारेही रोजगार कसा वाढेल हे आम्ही पाहणार आहोत. आज सकाळीच मी स्टार्टअप व नाविन्यता यात्रेला झेंडा दाखवून सुरुवात केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन

कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करणे हे सागरी किनाऱ्यालगतच्या पर्यावरण रक्षणासाठी महत्वाचे आहे. याशिवाय स्थानिकांना रोजगार देखील मिळणार आहे. हे लक्षात घेता येत्या वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणण्यासाठी नियोजन करणे सुरू आहे.

गेल्या दीड महिन्यात आम्ही जनहिताचे निर्णय घेतले आहेत. लोकांच्या हिताची कामे थांबविलेली नाहीत. शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देत आहोत. विद्युत वितरण प्रणालीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करीत आहोत. उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना सवलत दिली आहे. ग्रामीण भागातील गृहनिर्माण योजनांतील भूमीहीन लाभार्थींना जागा देण्यासाठी सवलती दिल्या आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) दुसरा टप्पा राबविणार आहोत. प्लॅस्टिकला पूर्णपणे बंदी घातली आहे. एमएमआरडीएला 60 हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास मान्यता दिली आहे, त्यामुळे प्रकल्पांना वेग आलेला दिसेल.


हेही वाचा – मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण; अनेक योजनांच्या घोषणा

First Published on: August 15, 2022 12:30 PM
Exit mobile version