अखेर एकनाथ खडसे म्हणाले, ‘…तर वेगळा विचार करावा लागेल’!

अखेर एकनाथ खडसे म्हणाले, ‘…तर वेगळा विचार करावा लागेल’!

भाजपमधील ज्येष्ठांचा एक गट नाराज असून त्यांचं नेतृत्व खुद्द एकनाथ खडसेच करत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार सुरू आहे. स्वत: एकनाथ खडसे हे जरी याला नकार देत असले, तरी त्यांनी वेळोवेली प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहाता त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. सोमवारी पुन्हा एकदा खडसे फॅक्टर अॅक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ खडसेंनी सोमवारी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमध्ये नक्की काय झालं, हे जरी खडसेंनी फारसं स्पष्ट सांगितलं नसलं, तरीदेखील भाजपवरची त्यांची नाराजी त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केल्यामुळे आता एकनाथ खडसे नक्की कोणता निर्णय घेणार, याविषयी तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

नक्की काय म्हणाले खडसे?

या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंनी पक्षातून जाणीवपूर्वक वारंवार होत असलेल्या अपमानावर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. ‘गेल्या ४०-४२ वर्षांपासून मी भाजपचं काम करतोय. अनेक चढ उतार मी पाहिले आहेत. अनेकदा मला अडचणीच्या वेळी बाकीच्या पक्षांनी त्या पक्षात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. मंत्रीपदाची ऑफर देखील दिली आहे. पण अशा परिस्थितीत देखील मी तसा काही निर्णय घेतला नाही. आम्ही पक्षाचं काम केलं, पक्ष वाढवला आहे. पक्ष सोडावा असं काही माझ्या मनात येत नाही’, असं खडसे यावेळी म्हणाले. मात्र, पुढे बोलताना त्यांनी सांगितलं, ‘परवा मी सांगितलं होतं की सातत्यानं जी अपमानास्पद वागणूक दिली गेली. विनाकारण आरोप करणं, विनाकारण मंत्रीपदावरून काढणं, चौकशी होऊनही निर्दोषत्व जाहीर न करणं, तिकीट कापणं असे प्रकार केले. मी कोअर कमिटीत होतो. पण तिथे निर्णय प्रक्रियेतून मला वगळलं. अशा प्रकारे जाणीपूर्वक अपमान करण्याचा प्रयत्न केला असेल, तर मला वेगळा विचार करावा लागेल, असं मी म्हणालो होतो’.


हेही वाचा – अखेर एकनाथ खडसेंची हाक दिल्लीने ऐकली; खडसेंना न्याय मिळणार?

आता खडसे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!

दरम्यान, ‘शरद पवारांसोबत मुलीच्या पराभवाविषयी चर्चा झाली’, असं देखील खडसेंनी काही माध्यमांकडे नमूद केलं. मात्र, त्यासोबतच आज शरद पवारांसोबत ४५ मिनिटांची भेट घेणारे एकनाथ खडसे उद्या म्हणजेत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे नक्की खडसेंच्या मनात काय चाललं आहे, याविषयी अनेक तर्क लढवले जाऊ लागले आहेत. खडसेंनी मागील आठवड्यात पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची भेट घेतल्यानंतर देखील अशीच चर्चा सुरू झाली होती. ‘नाराजांची मोट बांधावी लागत नाही, नाराज आपोआप एकत्र येतात’, अशी सूचक प्रतिक्रिया देखील खडसेंनी या भेटीनंतर दिली होती.

First Published on: December 9, 2019 7:18 PM
Exit mobile version