पक्षाबाहेर काढण्यासाठी जी नीती चालवली आहे ती बरोबर नाही – खडसे

पक्षाबाहेर काढण्यासाठी जी नीती चालवली आहे ती बरोबर नाही – खडसे

‘ज्यांनी चाळीस-चाळीस वर्ष खसता खाल्या घेतल्या त्यांच्यावर अशी परिस्थिती का आली? पक्षाबाहेर काढण्यासाठी जी निती चालवली आहे ती बरोबर नाही. इतकं छळून मारायचं नाही’, असा घणाघाती आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील भाजप श्रेष्ठींवर केला. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाषण करताना एकनाथ खडसे यांनी सध्याच्या राज्यातील भाजप श्रेष्ठींवर टीका केली.

नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?

आज ज्या पक्षात मी आहे त्या पक्षाचा मला आदेश आहे पक्षाच्या विरोधी बोलू नये. पण मी पक्षाच्या विरोधात कधीच बोललो नाही. पक्ष मलाही प्रिय आहे आणि पक्षातील नेतेही मला प्रिय आहेत. पण आज जी स्थिती आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही. पंकजाच्या मनातील दु:ख मला माहित आहे. तोंडावर गोड बोलायचं आणि मागे निवडणुकीत पाडायला प्रयत्न करायचं. हे घडलं नाही घडवलं गेलं आहे. तुम्हाला माझं म्हणंण पटतय की नाही पटतंय?

मला सांगा याठिकाणी तुम्ही पाहत आहात, काय प्रसंग आले माझ्या जीवनात? माझ्या आयुष्यात जसे आरोप झाले तसेच प्रसंग मुंडे साहेबांवरही झाले होते. तसेच प्रसंग आज माझ्यासोबतही घडत आहेत. मुंडे साहेबांच्या मतदारसंघात पंकजा ताईंना पाडण्याचं पाप तुम्ही का केलं? किती दिवस सहन करायचं? अजून आमचा पक्ष सोडायचा विचार नाही. पंकजाचं सोडून द्या, माझाच भरोसा नाही. ज्यांनी चाळीस-चाळीस वर्ष संघर्ष केला त्यांच्यावर अशी परिस्थिती का आली? पक्षाबाहेर काढण्यासाठी जी निती चालवली आहे ती बरोबर नाही. इतकं छळून मारायचं नाही. हे लोक वरुन बोलतात की, आज गोपीनाथ मुंडे असते तर खडसे मुख्यमंत्री झाले असते.

एकनाथ खडसे यांनी फडणवीसांचे मानले आभार

पक्षात मी ज्यांना मोठं केलं त्यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळायला नको होती. तरीही मी देवेंद्र फडणवीस यांचा आभार मानतो. गेल्या पाच वर्षांपूर्वी मी मुंडे साहेबांच्या स्मारकाला मंजूरी दिली होती. देवेंद्र फडणवीस यांनी २३ नोव्हेंबर २०१९ ला शपथ घेतली आणि २६ तारखेला राजीनामा दिला. २३ तारखेला त्यांनी शपथ घेतली आणि २४ तारखेला मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी त्यांनी वर्कऑर्डर काढल्याची माहिती मला सोशल मीडियावर मिळाली होती. पाच वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे अपघाती विमा सुरु कारा, अशी योजना सुरु करण्याची मागणी मी केली होती. पाच वर्ष झाले सरकार गेलं नव्यानं सरकार आलं मात्र स्मारक उभारलं गेलं नाही. तरीही २४ तारखेला मुंडे साहेबांचे स्मारक बांधलं जावं यासाठी जे वर्कऑर्डर काढलं गेलं त्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे.

भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील, हरिभाऊ बागडे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर आले आहेत. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी ‘पंकजा ताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा केल्या. दरम्यान, या कार्यक्रमाअगोदर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

चंद्रकांत दादा इथून पुढे अशी वागणूक देऊ नका – जानकर

कार्यक्रमात भाषण करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला चिमटा काढला. ‘आपल्या नेत्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभं राहायचं असतं. चंद्रकांत दादा तुम्ही कितीही आम्हाला त्रास दिला तरी आम्ही तुमच्यासोबत राहु. आमची नियत साफ आहे. आम्ही जोडलो गेलो ते फक्त गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच. दुसऱ्यांच्या घरी जाऊन आम्ही मोठे होणार नाही. फक्त इथून पुढे अशी वागणूक देऊ नका, हीच आमची विनंती आहे’, असे महादेव जानकर म्हणाले.

‘एखाद्या संकटाने, पराभवाने पंकजा ताई खचून जाणार नाहीत. पंकजा ताईंचा पराभव हा शेवटचा पराभव माना. पंकजा ताईंचा पक्षाला पुढे नेण्यात मोठा सहभाग राहणार आहे. आपण पंकजा ताईंच्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहु’, असे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले.

First Published on: December 12, 2019 2:34 PM
Exit mobile version