‘फडणवीसांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले’, अखेर खडसेंनी सांगितलं काय काय घडलं होतं!

‘फडणवीसांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले’, अखेर खडसेंनी सांगितलं काय काय घडलं होतं!

‘भाजपविषयी माझ्या मनात जराही किंतू नाही. पण ज्यांनी माझ्या करियरचा घात केला. माझे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केले त्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे मला पक्ष सोडावा लागला. ज्याने पक्ष उभारण्यासाठी आपल्या आयुष्याची ४० वर्ष घालवली त्या कार्यकर्त्याला पक्ष सोडवा लागतो ही गोष्ट मनालाही लागते. पण प्रत्येकाला इभ्रत असते, त्यालाही भावना असतात, त्याची उघड बदनामी होत असताना जो हे करत होता त्याची साधी चौकशी करण्याचे धाडस दाखवले गेले नाही. अशा ठिकाणी राहून न्याय कसा मिळणार?’ असा सवाल करत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवून दिला. शुक्रवारी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश घेणार आहेत.

‘रोहिणीला पद्धतशीरपणे पाडण्यात आलं’

आपला राजीनामा दिल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘मी पक्षात असंख्य खस्ता खाल्ल्या. भाऊसाहेब फुंडकर, प्रमोद महाजन, मुंडेसाहेब आणि नितीन गडकरींच्या जोडीने पक्ष वाढवण्यासाठी जिवाचे रान केले. त्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला केवळ बदनामी येणे ही बाब आपल्याला कायम सलत होती. राज्य सरकारमध्ये असताना माझ्यामागे सतत नऊ महिने पाळत ठेवण्यात आली होती. अखेर गजानन पाटील या कथित पीएला अटक करून मला राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आले. ही कारवाई फडणवीसांच्या गृह खात्याशी संबंधित लाचलुचपत विभागाने केली. विशेष म्हणजे माझा राजीनामा घेताना या राजीनाम्याची आणि या प्रकरणाच्या चौकशीची कुठलीही मागणी विरोधी पक्षांनी केली नव्हती. या कथित भ्रष्टाचाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आली. यात क्लीनचिट मिळूनही आपल्याला मंत्रिमंडळात घेण्यात आले नाही. विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. न मागता रोहिणीला उमेदवारी देण्यात आली आणि तिला पद्धतशीरपणे पाडण्यात आले. या पाडापाडीत कोण होते याची माहिती पुराव्यासह प्रदेशाध्यक्षांना दिली. पण काहीही झाले नाही’, असं ते म्हणाले.

‘माझी चूक काय?’

‘अंजली दमानिया यांचा विनयभंग केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यासाठी माजी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस उपायुक्तांना फोन केला. आणि माझ्यावर हा गुन्हा दाखल झाला. नुकताच या खटल्यातून मी सुटलो. ज्या जागेचा आणि माझा व्यक्तीश: काही संबंध नाही त्या भोसरीतील जागेची सारी कागदपत्रे दमानिया यांना पुरवण्यात आली. माझ्यामागे आयकर चौकशी लावण्यात आली. अशा परिस्थितीतही मी पक्षाशी प्रामाणिक होतो. पण बदनामीचा कहर झाला. खूप झाल्याने मला पक्षातून बाहेर पडावे लागते आहे’, असे खडसे म्हणाले तेव्हा ते भाऊक झाले होते. ‘मी सरकारमधून बाहेर असताना माझा राजीनामा का घेण्यात आला? माझी चूक काय याचा जाब मी विधानसभेत अनेकदा विचारला. पण काहीही कारण देण्यात आले नाही. केवळ बदनामी करणे हा कट माझ्याविरोधात रचला गेला’, असा गंभीर आरोप खडसे यांनी केला.

‘पदाधिकारी काय करत होते?’

गेल्या काही दिवसांपासून खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार असल्याची चर्चा होती. बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत खडसेंच्या प्रवेशाची माहिती दिल्यावर खडसे यांनी जळगावात पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. ‘मला पक्षाने खूप दिले असे सांगणार्‍यांना खडसे यांनी आम्ही काही कमी खस्ता खाल्ल्या नाहीत, अशा शब्दात सुनावले. पक्षाने दिलेल्या उमेदवारीविरोधात कामे करणार्‍यांविरोधात पुरावे देत अशा व्यक्तींविरोधात शिस्तभंगाची मागणी केली. पण ती झाली नाही, याचा अर्थ तुमचा त्यांना पाठिंबा होता, असा निघतो. तरीही कारवाई होत नसेल तर आजवर पदाधिकारी काय करत होते?’, असा सवाल त्यांनी प्रदेशाध्यक्षांचे नाव न घेता केला.

First Published on: October 21, 2020 7:38 PM
Exit mobile version