घरनवी मुंबईGanesh Naik Vs Naresh Mhaske : नरेश म्हस्केंविरोधात नाईकांची पेटवली संघर्षाची वात

Ganesh Naik Vs Naresh Mhaske : नरेश म्हस्केंविरोधात नाईकांची पेटवली संघर्षाची वात

Subscribe

ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नवी मुंबईतील भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिले आहेत. डॉ. संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्याने गणेश नाईक समर्थक संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे गणेश नाईकांकडे झालेल्या बैठकीला आलेले म्हस्के, फाटक यांना संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांमुळे मागच्या दाराने परतावे लागले.

ज्ञानेश्वर जाधव आपलं महानगर वृत्तसेवा

नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे आणि नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांचे समर्थक माजी नगरसेवक तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत निषेध केल्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच हातघाईवर आल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेश नाईक यांच्या क्रिस्टल हाऊसवर भाजप नेते, पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीला नरेश म्हस्के, रवींद्र फाटकदेखील उपस्थित होते. पण भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे उग्र रूप पाहून ते मागच्या दाराने परतले.

ठाणे लोकसभा मतदारसंघ मिळावा यासाठी भाजप शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील होता. शिवाय भाजपकडून माजी खासदार डॉ. संजीव नाईक दुसर्‍यांदा या मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे माजी महापौर आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप पदाधिकारी नाराज झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : ठाण्यातून नरेश म्हस्के, तर कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी

नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्याने गणेश नाईक यांच्या क्रिस्टल हाऊसमध्ये सकाळपासूनच नाराजीचा सूर आळवत बैठकांचा सपाटा सुरू झाला. नरेश म्हस्के यांना नवी मुंबईतून सहकार्य न करण्याची भूमिका या बैठकीत घेण्यात आली. एवढेच नव्हे तर डॉ. संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्याने भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, मंडल, बूथ संघटक आणि वॉरियर्सने पदांचे राजीनामे दिले आहेत. गणेश नाईकांनी शिवसेनेविरोधात संघर्षाची वात पेटवल्यामुळे एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : राजन विचारे 8 वर्ष गायब, ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय पक्का; मनसेचा टोला

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्याचा उद्या शुक्रवारी (३ मे) अंतिम दिवस आहे. अशातच आमदार गणेश नाईकांनी उघडपणे नाराजीला वाट करून दिल्यामुळे त्यांची समजूत काढण्यास फडणवीस-शिंदे यशस्वी होतील का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

विशेष म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. यात बेलापूर विधानसभा मतदारसंघात मंदा म्हात्रे, ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक आणि ठाणे मतदारसंघातून संजय केळकर हे तीन आमदार भाजपचे आहेत. मिरा-भाईंदरमधील गीता जैन अपक्ष आमदार असून त्यांनी सध्या शिवसेनेशी जवळीक आहे. शिवाय कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे, शिक्षक पदवीधर मतदारसंघातून शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे दोन्ही आमदार भाजपचे आहेत. या शिवाय नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती पकड आहे. असे असताना ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे नाईक गटात प्रचंड नाराजी आहे.

हेही वाचा… Live Update : नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्याने नवी मुंबईतील भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

ठाणे लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माजी राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुध्दे, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार गीता जैन अणि माजी आमदार संदीप नाईक यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाचपाखाडी मतदारसंघ याच लोकसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे.

दरम्यात संजीव नाईक यांना उमेदवारी नाकारल्यानंतर नवी मुंबईत भाजप पदाधिकार्‍यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. काल (१ मे) नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर ‘आम्ही नाईक समर्थक‘, ‘आमचा उमेदवार संजीव नाईक‘ अशा आशयाचे मेसेज झळकले होते. त्यानंतर आज सकाळपासून नवी मुंबईत झालेल्या बैठकीत भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे पुढे काय होणार, याची सर्वांना उत्कंठा लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -