एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाटांना दिली महत्त्वाची जबाबदारी

एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाटांना दिली महत्त्वाची जबाबदारी

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडी अत्यंत खालच्या पातळीवर जात असल्याचे सांगत शिवसेनेला (शिंदे गटाला) लक्ष केले जात आहेत. पण या सर्वांना उत्तर देण्यासाठी शिंदे गटाकडून दिपक केसरकर यांना पुढे केले जात होते. मात्र, आता याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडून संजय शिरसाट यांना देण्यात आलेली आहे. शिंदे गटातील अनेक गोष्टींबाबत संजय शिरसाट हे गेल्या अनेक दिवसांपासून परखडपणे भूमिका मांडताना दिसून येत आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांची आता शिवसेनेच्या प्रवक्ते पदी अधिकृत निवड केली आहे. या संदर्भातील पत्र मुख्यमंत्री शिंदे यांनी संजय शिरसाट यांना दिले आहे.

संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते शिवसेनेच्या तिकीटावर सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आलेले आहेत. तसेच, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना संजय शिरसाट यांना मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती. परंतु त्यावेळी त्यांच्याऐवजी संदीपान भुमरे व नव्यानेच शिवसेनेत आलेल्या अब्दुल सत्तार यांना मंत्री करण्यात आले होते. तेव्हापासूनच ते नाराज होते.

दरम्यान, त्यावेळी संजय शिरसाट यांची तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढली. आघाडी सरकार असतांना नगरविकास खात्याकडून शिरसाट यांच्या मतदारसंघासाठी शिंदे यांनी भरघोस निधी दिला होता. त्यामुळे जेव्हा शिंदेंनी बंडांचा झेंडा फडकवला तेव्हा त्याला भक्कम साथ शिरसाट यांनी दिली होती.

महत्त्वाची बाब म्हणजे, सुरत, गुवाहाटीतून थेट जाहीर पत्र लिहित उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवणारे संजय शिरसाट हे पहिले आमदार होते. तेव्हापासून घेतलेली आक्रमक भूमिका राज्यातील सत्तांतर होवून अद्याही मंत्रीपद मिळाले नसले तरी त्यांनी कायम ठेवली आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांच्यासह जिल्ह्यातील ठाकरे गटाचे स्थानिक नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यावर शिरसाट सातत्याने शाब्दिक हल्ला करताना दिसत आहेत.

संजय शिरसाट यांची गेल्या काही महिन्यातील आक्रमक भूमिका पाहत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिरसाट यांना महत्त्वाचे पद दिल्याचे बोलले जात आहे. परंतु, राज्यमंत्री मंडळात संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिरसाटांना प्रवक्ते पद देत तुर्तास त्यांची नाराजी काही प्रमाणात कमी करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.


हेही वाचा – “मला घेणार…नाही घेणार हे शिंदे गटाचे नेते का बोलतात?”, अजित पवारांचा संतप्त सवाल

First Published on: April 18, 2023 3:12 PM
Exit mobile version