घरमहाराष्ट्र"मला घेणार...नाही घेणार हे शिंदे गटाचे नेते का बोलतात?", अजित पवारांचा संतप्त...

“मला घेणार…नाही घेणार हे शिंदे गटाचे नेते का बोलतात?”, अजित पवारांचा संतप्त सवाल

Subscribe

कारण नसताना माझ्याबाबत किंवा माझ्या सहकाऱ्यांबाबत गैरसमज जाणीवपूर्वक पसरवण्याचं काम होतंय, असं म्हणत अजित पवार यांनी या चर्चांवर पूर्णविराम लावलाय. यासोबत त्यांनी शिंदे गटातील नेत्यांवरही टीका केलीय.

अजित पवार हे नॉट रिचेबल झाल्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भूमिकेवरून राज्यात तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. 35 ते 40 आमदारांसह अजित पवार हे भाजपसोबत जाणार, पवारांनी अमित शहांची भेट घेतली, जागावाटपही ठरल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप घडणार, या चर्चांना आणखी उधाण आलंय. यावर आता अजित पवार यांनी स्वतः या चर्चांवर खुलासा केलाय. कारण नसताना माझ्याबाबत किंवा माझ्या सहकाऱ्यांबाबत गैरसमज जाणीवपूर्वक पसरवण्याचं काम होतंय, असं म्हणत अजित पवार यांनी या चर्चांवर पूर्णविराम लावलाय. यासोबत त्यांनी शिंदे गटातील नेत्यांवरही टीका केलीय.

राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या चर्चा आणि या चर्चांना दुजोरा देणाऱ्या काही घडामोडी पाहता आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडणार, हे चित्र जवळजवळ आणखी गडद होताना दिसत असतानाच आता अजित पवार यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. गेले काही दिवस माध्यमातून येत असलेल्या उलटसुलट बातम्यांवर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडत माध्यमांतील सूत्रांची हवाच काढून टाकली.
एकीकडे अजित पवार भाजपासोबत जाणार या चर्चा वेगाने पसरू लागल्या होत्या आणि दुसरीकडे या चर्चांनी शिंदे गटातील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. यावर शिंदे गटातील नेते सुद्धा आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून आले. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी देखील अजित पवारांच्या भाजपमध्ये येण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. जर अजित पवार भाजपात सहभागी झाले तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती. अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडली तर आम्ही त्यांचं स्वागत करु. पण आम्ही सत्तेत राहणार नाही, असंही ते म्हणाले होते. इतकंच नव्हे तर मी अजित पवार यांच्या घरी कधी गेलो नाही, पण आता थेट अजित दादांना शपथविधीसाठीच घेऊन येणार आहे, असं देखील संजय शिरसाट म्हणाले होते.

- Advertisement -

हे ही वाचा: “…आता अजित दादांना थेट शपथविधीलाच घेऊन येणार”, राजकीय भूकंपाबाबत शिवसेनेचे संजय शिरसाट यांचं वक्तव्य

- Advertisement -

या सर्व चर्चांवर आता अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी अजित पवारांनी शिंदे गटातील नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. “मी भाजपाला पाठिंबा देणार ही शक्यता आम्ही कुणीच वर्तवली नाही. मला घेणार…नाही घेणार हे शिंदेंचे नेते का बोलतात? असा सवालच यावेळी अजित पवारांनी उपस्थित केला. तसंच माझ्या भूमिकेवर शिंदे गटाच्या नेत्यांना बोलण्याचा काय अधिकार? असं देखील यावेळी अजित पवारांनी विचारलं. कोण चाललंय भाजपमध्ये? तेव्हा तुम्ही घेणार? असा संतप्त सवाल देखील यावेळी अजित पवारांनी विचारला. आता या सर्व चर्चा थांबवा, यामध्ये कारण नसताना गैरसमज करून घेऊ नका, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले.

 

आज महाराष्ट्रातील जनतेच्या पुढे महत्वाचे प्रश्न आहेत. त्या महत्वाच्या प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न (बेरोजगारी, महागाई, अवकाळी पाऊस) त्यावरुन लक्ष वळवले जात आहे. ७५ हजार पदांची भरती करण्यात येणार होती ती भरती अजून होत नाहीय. कापूस, कांदा शेतकरी हैराण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी दौरा केला त्यांचे त्यांनी काम केले. त्यांचे ते कर्तव्य होते परंतु दौरा केल्यानंतर तातडीची मदत केली पाहिजे होती ती मदत होताना दिसली नाही. बारदाने नाहीत म्हणून खरेदी केंद्रांचे काम बंद पडले हे काय उत्तर झाले का? असा संतप्त सवाल करतानाच बारदाने गोळा करण्याचे किंवा उपलब्ध करून देण्याचे काम सरकारचे आहे. याकडे लक्ष द्यायला हवे त्याकडे लक्ष नाही असे खडेबोलही अजित पवार यांनी सरकारला सुनावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -