कोश्यारींना कोरोना झाल्यानंतर शिंदे पाठिंब्याचं पत्र घेऊन गोव्याला जाण्याची शक्यता

कोश्यारींना कोरोना झाल्यानंतर शिंदे पाठिंब्याचं पत्र घेऊन गोव्याला जाण्याची शक्यता

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना मुंबईतील रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी आपल्या आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र घेऊन एकनाथ शिंदे मुंबईत रवाना होणार होते. मात्र, महाराष्ट्राच्या राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्यामुळे शिंदे पाठिंब्याचं पत्र घेऊन गोव्याला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रात आल्यावर कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे एकनाथ शिंदे गुवाहाटीवरून गोव्याला जाणार आहेत. परंतु राजकीय तज्ञांच्या मते, राज्यपाल प्रभार देताना तांत्रिक अडचणी येणार आहेत. जर एखादे राज्यपाल हे कुठल्यातरी कामानिमित्त किंवा इतर गोष्टींसाठी सुट्टीवर असतील तर दुसऱ्या राज्यपालांकडे चार्ज देण्यात येतो. राज्यपालांचा प्रभार दुसऱ्या राज्यपालांना देण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींकडे असतो. त्यामुळे राज्यपालांना कोरोना झाल्यामुळे ते आपला पदभार सांभाळण्यासाठी दुसऱ्याकडे देऊ शकतात.

भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. परंतु त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये. मात्र, त्यांना मागील दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षणं दिसत होती. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मंगळवारी रात्री त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर राज्यपाल राज्य सरकारला विश्वास मत सिद्ध करण्याच्या सूचना देण्याची शक्यता होती. परंतु आता राज्यपाल रूग्णालयात दाखल झाले असून गोव्याच्या राज्यपालांना पत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे शिंदे पाठिंब्याचं पत्र देतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : आम्हाला ५० आमदारांचा पाठिंबा, काँग्रेसमधील आमदार संपर्कात; राज्यमंत्री बच्चू कडूंचा दावा


 

First Published on: June 22, 2022 11:09 AM
Exit mobile version