आधी शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांना वंदन मगच अविश्वास ठरावावर मतदान…बंडखोरांच ठरलं

आधी शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांना वंदन मगच अविश्वास ठरावावर मतदान…बंडखोरांच ठरलं

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असून महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. याचपार्श्वभूमीवर, भाजपने ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान केले आहे. तसेच उद्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. त्यासाठी गेल्या आठ दिवस गुवाहाटीत मुक्कामी असणारा शिंदेगटही मुंबईकडे निघाला आहे. पण मुंबईत आल्यानंतर थेट विधानसभेत न जाता शिवसैनिकांचे आराध्य दैवत असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतरच शिंदेगट विधानसभेची पायरी चढणार असल्याचे समजते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. शिंदे यांच्याबरोबर ३९ आमदार आल्याने शिवसेनेला खिंडार पडले आहे. त्यातच इतर अपक्ष आमदारही शिंदेसोबत गेल्याने शिंदे यांचे राजकारणातील वर्चस्व वाढले असून उद्धव ठाकरे यांची मात्र पुरती गोची झाली आहे. यामुळे कधी भावनिक तर कधी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव यांनी बंडखोरांना माघारी फिरण्याची साद घातली. पण तरीही एकनाथ शिंदे मविआमधून बाहेर पडण्यावर ठाम असल्याने ठाकरे यांची नामुष्की वाढली आहे. कालपरवापर्यंत सच्चे शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असलेले आमदार एक एक करत शिंदेगटात सामील झाले आहे. यामुळे राज्यात शिंदे गट विरुद्ध उद्धव गट निर्माण झाले. पण तरीही आम्हीच खरे शिवसैनिक असा दावा सातत्याने एकनाथ शिंदेगटाकडून करण्यात येत आहे. बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारधारा पुढे नेण्यासाठीच मविआमधून बाहेर पडणे गरजेचे असल्याचेही त्यांनी वारंवार म्हटले आहे. एकनाथ शिंदे गटाकडून बाळासाहेबांचीच हिंदुत्वाची विचारधारा पुढे न्यायची असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे धार्मिक आणि देवभोळे असून बाळासाहेब आणि शिवसेनेवरही त्यांची तेवढीच अपार श्रद्धा आहे. याची अनेकवेळा शिवसैनिकांनाही प्रचिती आली आहे. यामुळे जरी शिंदे यांनी बंड केले असले तरी मनातून ते शिवसैनिकच आहेत. यामुळेच उद्या मुंबईत आल्यावर एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत असलेले आमदार सर्वप्रथम विमानतळावरून थेट शिवाजी पार्क येथे जाणार असून तेथे ते बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर चाफ्याच्या फुलांचे हार वाहून त्यांचे आशिर्वाद घेऊनच विधानसभेत जाणार आहेत.

First Published on: June 29, 2022 5:41 PM
Exit mobile version