बाबरी पाडली तेव्हा उद्धव कुठे होते? त्यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बाबरी पाडली तेव्हा उद्धव कुठे होते? त्यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अयोध्येतील बाबरी मशीद पतनाच्या संदर्भात भाजपचे नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळं राज्यातील राजकारण पुन्हा ढवळून निघालं आहे. यावर वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळे खुलासे देखील कऱण्यास सुरूवात केलीय. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. इथल्या वनकुटे परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेट शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची झालेल्या नासाडीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सर्व माहिती दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यासोबतच उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय.

मुख्यमंत्री गुलाम आहेत. हिंमत असेल तर यावर प्रतिक्रिया द्यावी. पण गुलामाला हिंमत नसते. अन्यथा राजीनामा द्या, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय़ राऊत यांनी केली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांनी सवाल केला असता यावर उत्तर देताना ‘संजय राऊतांना कोण विचारतो? कोण आहेत ते? त्यांचं चॅनल सुरू झालं की लोक टीव्ही बंद करतात’ असं एकनाथ शिंदे म्हणाले.

यापुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाष्य देखील केलं. याबाबत चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली आहे. ज्यावेळी बाबर मशीद पाडण्यात आली त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे होते? असं त्यांना विचारायचं होतं. बाळासाहेबांबद्दलची भूमिका त्यांची स्पष्ट आहे. बाबरीच्या मुद्द्यावर बाळासाहेबांची भूमिका जगजाहीर आहे. त्यावेळी ‘हम हिंदू हैं’ चा नारा बाळासाहेबांनी दिला होता. अयोध्येत बाबरी पाडताना कोणताही पक्ष नसून सर्व रामभक्त होते. त्यानंतर जी मुंबईत दंगल झाली, त्यात बाळासाहेब ठाकरे नसते तर काय झालं असतं? त्यांनी मुंबईचं संरक्षण केलं. ज्या ज्या वेळी राज्यावर संकट आलं त्या प्रत्येक वेळी बाळासाहेब ठाकरेंनी परखड भूमिका घेतलेली आहे. मग स्वातंत्र्यवीर सावरकरांची असो किंवा मग हिंदुत्वाची असो. यावर आता जे बोलत आहेत त्यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही.”, असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.

“तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान मूग गिळून बसतात. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला त्यांच्याबरोबर गळाभेट करतात. अशा लोकांनी काय दुसऱ्यांना शिकवावं? असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय. अयोध्येमध्ये राम मंदिर आणि कश्मिरमध्ये ३७० कलम हे बाळासाहेबांचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलंय. त्यामुळे यावर अशा लोकांना बोलण्याचा नैतिक अधिकारच नाहीय. त्यांनी नैतिकता गमावलेली आहे.”, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय.
“तसंच हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना अधिकची मदत देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मागच्या सरकार काळात फक्त घोषणा झाल्या. त्या निर्णयाची आम्ही अंमलबजावणी केली. शेतकऱ्यांच्या विषयात राजकारण आणू नका. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका. कोण यावरून राजकारण करतंय, हे शेतकऱ्यांना कळतंय. अयोध्येत जाऊन प्रभू रामचंद्राच्या चरी बळीराजाच्या सुखासाठीच प्रार्थना केली.”, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.
“आम्ही जे करतो ते लपूनछपून करत नाही. फक्त लांबून आदेश देणारं आमचं सरकार नाही. तसंच मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही.’, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावलाय.

 

First Published on: April 11, 2023 1:31 PM
Exit mobile version