महिलांचा भक्कम आधार हरपला; ज्येष्ठ समाजसेविका इला भट्ट यांचे निधन

महिलांचा भक्कम आधार हरपला; ज्येष्ठ समाजसेविका इला भट्ट यांचे निधन

गांधीवादी विचारसरणी, सेवा संस्थेच्या संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्त्या इला भट्ट यांचे निधन झाले आहे. इला भट्ट यांनी बुधवारी अहमदाबाद येथील हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्या 89 वर्षांच्या होत्या. इला रमेश भट्ट या देशातील असंघटित महिला कामगारांसाठी काम करणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. इला भट्ट यांच्या मृत्यूनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. इला भट्ट यांच्या पश्चात दोन मुले अमिमायी आणि मिहीर आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. (ela bhatt dies womens rights activist sewa founder)

इला भट्ट यांनी महिलांना अधिकार मिळवून देण्यासाठी सहकार चळवळीत सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय कामगार, महिलांच्या प्रश्नांशी संबंधित अनेक चळवळींमध्ये त्यांचा सहभाग होता. स्वयंरोजगार करणाऱ्या महिला कामगारांना संघटित करत त्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य केले. राष्ट्रीय महिला आयोगाची उद्दिष्टे आणि कार्य ठरविण्याची जबाबदारी इला भट्ट यांच्यावर सोपविलेली होती. त्यासाठी त्यांनी देशभरातील स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांच्या भेटी घेऊन श्रमशक्ती अहवाल तयार केला.

सन 1972 मध्ये स्वाश्रय महिला सेवा संघ (सेवा) नावाची संस्था स्थापन केली. सन 1972 ते 1996 त्या संस्थेच्या सरचिटणीस होत्या. इला भट्ट यांनी महिलांचे अधिकार आणि त्यांच्या रोजगारासाठी महत्त्वाचे कार्य केले होते. इला भट्ट यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राईट लाईव्हलीहुड अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.

महिलांचे अधिकार आणि मायक्रो-फायनान्स क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल इला भट्ट यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते. त्यानंतर, सन 2011 मध्ये गांधी शांतता पुरस्कार, 1985 मध्ये पद्मश्री आणि 1986 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते.

इला भट्ट यांच्या निधनानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले. “इला भट्ट यांच्या निधनानंतर अत्यंत दुःख झाले. महिला सक्षमीकरण, समाजसेवा आणि तरुणांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्या दीर्घकाळ स्मरणात राहतील”, असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले.


हेही वाचा – अखेर सापडली! कोल्हापुरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा कर्नाटकात लागला पत्ता

First Published on: November 3, 2022 8:32 AM
Exit mobile version