नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होणार

नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होणार

महापौरपदाची निवडणूक येत्या २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या संदर्भात महापालिकेच्या नगरसचिवांनी विभागीय आयुक्त राजाराम माने यांना सादर केला होता. तो विभागीय आयुक्तांनी मंजूर केला असून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण खुल्या प्रवर्गाला जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरु झाल्या. महापालिकेत भाजपाला अगदी स्पष्ट बहुमत आहे. यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला कोणतीही अडचण नाही.

परंतु, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्याने नाशिक महापालिकेतील भाजपकडील महापौरपदही धोक्यात येऊ शकते. यामुळे या पदासाठी शिवसेना आणि भाजपकडून अटीतटीची लढत झाल्याशिवाय राहणार नाही, हेही निश्चित. भाजपाकडे ६५ नगरसेवक असले तरी शिवसेना दोन्ही काँग्रेस, अपक्ष आणि मनसेला बरोबर घेऊन महापौरावर कब्जा करू शकते. त्यातही भाजपाकडील काही नाराज नगरसेवक माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या माध्यमातून हाती लागले तर शिवसेनेच्या दृष्टीने ही फायदेशीर बाब असेल. यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी आपापले नगरसेवक ‘सेफ झोन’मध्ये ठेवणे आता भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

महापालिकेतील यापूर्वीचे महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी होते. त्यावेळी भाजपाने ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी यांना संधी दिली. तीन महिन्याच्या मुदतवाढीनंतर आता त्यांचा कार्यकाळ कालावधी येत्या १५ डिसेंबरला संपत आहे. मात्र महापौरपदाच्या निवडणुकीस महिनाभराचा कालावधी दिल्यास विरोधकांना खलबतांसाठी पुरेसा कालावधी मिळू शकतो. विशेषत: भाजपचे नगरसेवक कवेत घेणे विरोधकांना सोयीचे होऊ शकते. या भीतीपोटी निवडणूक येत्या २२ नोव्हेंबरच्या आत घेण्याचे नियोजन सत्ताधार्‍यांचे सुरु झाले आहे. महापौरपदाच्या मुदतवाढीपूर्वी २२ नोव्हेंबरला महापौरपदाची निवडणूक घेण्याचे परिपत्रक यापूर्वी काढण्यात आले होते. नियमानुसार त्याच्या एक महिन्यानंतर निवडणूक होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.

पक्षीय बलाबल असे

First Published on: November 15, 2019 3:43 PM
Exit mobile version