आता सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र व वसुली मोहीम

आता सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र व वसुली मोहीम

वीजबिल भरणा केंद्र आणि वसुली मोहिम आता सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार आहे. महावितरणाच्या कल्याण कार्यालयांर्गत ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीसाठी मोहिम सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे वीजबिल त्याचप्रमाणे थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. कल्याण परिमंडलांतर्गत कल्याण एक आणि दोन, वसई आणि पालघर या चार मंडलात सर्व वर्गवारीतील जवळपास २६ लाख वीज ग्राहक आहेत. कृषिपंप ग्राहक वगळता इतर सर्व ग्राहकांकडून त्यांनी वापरलेल्या विजेचे चालू वीजबिलासह थकबाकीचे एकूण ९९२ कोटी रुपये मार्च अखेरपर्यंत वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु मार्च महिन्यातील शेवटचे दहा दिवस शिल्लक राहत असताना ४३६ कोटी रुपयांची वसुली प्रलंबित आहे.

घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील ८ लाख ८० हजार ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे ३७५ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही वसुली मोहीम आणि अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. वीज ग्राहकांनी वसुली मोहिमेत सहकार्य करावे व भरणा केंद्र सुरु ठेवण्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

मार्च महिन्यात आतापर्यंत कल्याण परिमंडलातील ७ लाख ५८ हजार ग्राहकांनी त्यांच्या १५२ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमाद्वारे ऑनलाईन केला आहे. कोरोना विषाणूचा पुन्हा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन वीज ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून घरबसल्या वीजबिल भरण्याची सुविधा देणाऱ्या सेवेचा लाभ घ्यावा व सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


हेही वाचा – IMD ALERT ! विकेंडला अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा ईशारा, कधी, कुठे, किती पाऊस ?

First Published on: March 19, 2021 8:01 PM
Exit mobile version