दिवाळी सुट्टीनंतर अकरावीचे ऑनलाईन वर्ग पुन्हा सुरू

दिवाळी सुट्टीनंतर अकरावीचे ऑनलाईन वर्ग पुन्हा सुरू

प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत २ नोव्हेंबरपासून अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले. मात्र त्यानंतर लगेच आलेल्या दिवाळीमुळे विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली. परंतु आता ३ डिसेंबरपासून पुन्हा नव्याने अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. या ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

कोरोनामुळे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. कोरोना व त्याचबरोबर मराठा आरक्षण यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यसााठी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले होते. या ऑनलाईन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे. मात्र ११ नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्ट्या जाहीर झाल्या, तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांच्या इतर शालेय कामकाजामुळे २ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन वर्गांचे लाईव्ह प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. मात्र आता हे प्रक्षेपण ३ डिसेंबरपासून सुरु करण्यात आले आहे. तासिकांचे तपशीलवार वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या https://covid१९.scertmaha.ac.in/eleventh या लिंकवर उपलब्ध करण्यात आले आहे. या वर्गांचे शाखानिहाय दैनिक युट्युब लिंक वेळापत्रकामध्ये नमूद केले असून, विद्यार्थ्यानी लिंकवरून तासिकांची माहिती घ्यावी, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक विकास गरड यांनी केले आहे.

First Published on: December 4, 2020 8:10 PM
Exit mobile version