बदलापुरात खेळाच्या मैदानावर स्थानिक नेत्याकडून अतिक्रमण, खेळाडूंकडून नाराजी व्यक्त

बदलापुरात खेळाच्या मैदानावर स्थानिक नेत्याकडून अतिक्रमण, खेळाडूंकडून नाराजी व्यक्त

बदलापूर शहरातील तालुका क्रीडा संकुलावर वृक्षारोपण करून स्थानिक नेत्याने अतिक्रमण केल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे. त्यामुळे मैदान छोटे होत असून खेळण्यासाठी पुरत नसल्याने खेळाडू नाराजी व्यक्त करत आहेत.

बदलापूर शहरातील कात्रप भागात तालुका क्रीडा संकुलाचे भव्य असे मैदान आहे. या मैदानालगतच माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांचा एक प्लॉट आहे. याच प्लॉटसाठी रस्ता तयार केल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे. मैदानावर अतिक्रमण केल्याने खेळाडूंमधून नाराजी व्यक्त होत आहे.

बदलापूर शहरातील खेळाडूंसाठी सध्या क्रीडा संकुल लागत असलेले एकमेव ग्राउंड आहे. त्याचबरोबर पहाटे आणि सायंकाळच्या सुमारास अनेक नागरिक देखील मैदानावर फिरायला येतात. या ठिकाणी 400 मीटरचा जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे. मात्र जॉगिंग ट्रॅक लगतच वृक्षारोपण करण्यात आल्याने जॉगिंग ट्रॅक देखील लहान झाला आहे. यासोबत या मैदानावर फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी आणि अनेक तरुण मुले पोलीस भरतीची प्रॅक्टिस करण्यासाठी येतात. त्यामुळे हे ग्राउंड लहान होऊ नये आणि ग्राउंड वाचवावे अशी मागणी खेळाडूंमधून केली जात आहे.

दरम्यान याबाबत माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांना विचारले असता ग्राउंडच्या चारही बाजूने रस्ता असणार आहे, त्यामुळे रस्ता तयार करण्याआधी आम्ही वृक्षारोपण केले आहे. यामध्ये कोणतेही अतिक्रमण केले नसल्याचे सांगत, शिंदे यांनी खेळाडूंनी केलेले आरोप फेटाळले आहेत.

आम्ही मागील दहा वर्षांपासून या ग्राउंडवर खेळत आहोत. आम्ही सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. आम्हाला बदलापूर शहरात हे एकमेव मैदान आहे. त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी रस्ता तयार करून मैदान छोटे होत असेल तर हे अन्यायकारक आहे.
– विकास भांडे, खेळाडू

 

मी या ठिकाणी दररोज रनिंग, व्यायाम आणि खेळण्यासाठी येतो. मात्र रनिंग ट्रॅकवर झाडे लावल्याने ट्रॅक छोटा झाला आहे. प्रशासनाने संबंधितावर कारवाई करावी आणि आमचे ग्राउंड वाचवावे.
– चेतन पाटील,खेळाडू

 

मी केलेले वृक्षारोपण हे कोणतेही अतिक्रमण नाही. या मैदानाचा पूर्ण प्लॅन माझ्याकडे आहे. या प्लॅनमध्ये मैदानाच्या चारही बाजूने रस्ता आहे. लवकरच या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुद्धा करण्यात येणार आहे. काँक्रिटीकरण सुरू होण्यापूर्वी रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, म्हणून आम्ही ही झाडे लावली आहेत.
– संभाजी शिंदे, माजी नगरसेवक, प्लॉटधारक

First Published on: February 16, 2023 5:49 PM
Exit mobile version