दहावी, बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरनंतर सुरू होणार – शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

दहावी, बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरनंतर सुरू होणार – शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

महाराष्ट्र शासनाने अनलाँकनंतर सर्वच क्षैत्रात पुनश्च हरिओमला सुरूवात केली आहे. वाहतुकीची साधने, प्रवास व्ययस्था, नाट्य, सिनेमागृह, बाजारपेठ सुरळीतपणे सुरू केलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

शाळा बंद असल्यातरी शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच २३ नोव्हेंबर २०२० पासून राज्यातील शाळा चालू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतर शाळा सुरु करण्यात येतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

शालान्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे दहावी व बारावीच्या परीक्षा वेळापत्रकासंदर्भात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन परीक्षा मंडळातर्फे परीक्षा जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊन शाळा अध्ययन-अध्यापन प्रक्रिया व परीक्षा पार पाडण्यासाठी सरकार सक्षमपणे विचार करेल असे शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करूनच शाळा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या संदर्भात पालकांची परवानगी घेऊनच आरोग्य विषयक उपाययोजना करूनच शाळेतील कामकाज करण्यात येईल.

First Published on: November 6, 2020 3:23 PM
Exit mobile version