मुंबईत नाल्यांमधील गाळ काढण्याचे ७८ टक्के काम पूर्ण – आदित्य ठाकरे

मुंबईत नाल्यांमधील गाळ काढण्याचे ७८ टक्के काम पूर्ण – आदित्य ठाकरे

मुंबईत नाल्यांमधील गाळ काढण्याचे ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे. तसंच, यंदाच्या पावसाळ्यात परळच्या हिंदमाता परिसरात पाणी साचण्याची शक्यता कमी असल्याचा दावा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार पत्रकार परिषदेत मान्सूनपूर्व कामांची माहिती दिली.

गेल्या अनेक महिन्यांपासून मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेत असून, मान्सूनपूर्व कामं युद्धपातळीवर सुरू असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटले. तसेच, यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यावर पाणी साचू नये यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफाई होणे महत्वाचे असून, आतापर्यंत नाल्यांमधील गाळ काढण्याचे ७८ टक्के काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

“नालेसफाई, रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. कुणी चांगले सांगितले, तर आम्ही सूचनांवर कारवाई करु. मुंबईत काही भागात भूस्खलनाबाबत कारवाई केली आहे. पुढच्या काही वर्षात तिथल्या झोपडपट्टींचे स्थलांतर केले जाईल. पण सध्या काही तात्पुरत्या सुविधा केल्या जातील. मुंबईतील नाल्यांमध्ये सिल्टेशनचा प्रॉब्लेम आहे. जो नद्यांमध्ये होतच असतो. त्यातील फ्लोटींग डेब्रीही हटवण्यात आल्या आहेत, अजूनही कामं सुरु आहेत. 78 टक्के काम झाले आहे, लोक कचरा टाकत असतात, ते काम रोज सुरुच असतं.”, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई महापालिका मुख्यालयात पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या सोबत त्यांनी एक महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व इतर कामांचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे कबुली दिली आहे.

मुंबईत सध्या पावसाळ्यापूर्वी आवश्यक नद्या व नाले यांची सफाईकामे सुरु आहेत. आतापर्यंत ७८ टक्के नालेसफाई झाली आहे. तसेच, पालिकेने आतापर्यंत केलेल्या विविध उपाययोजनांमुळे ९० टक्के फ्लडिंग स्पॉटवरील पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असा दावाही मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. तसेच,अतिवृष्टी, ढगफुटी झाली तर कोणाच्या हातात परिस्थिती राहत नाही मात्र तरीदेखील सर्वोत्तम यंत्रणा मुंबई महापालिकेकडे आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी, नालेसफाई कामांची प्रमुख जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू व संबंधित पालिका अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

इमारत पुनर्विकास व इतर कामांमुळे खड्डे

मुंबईत सध्या सीसी रोड बनवले जात आहेत. नवीन रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत ; मात्र जुन्या रस्त्यांच्या ठिकाणी इमारत पुनर्विकासाची कामे व इतर कामे यांमुळे रस्त्यांवर खड्डे पडू शकतात, असे त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर बोलताना सांगितले.

दरडग्रस्त भागांसाठी ६२ कोटींचा निधी

डोंगराळ, दरडग्रस्त भागात दुर्घटना घडून जीवित हानी होऊ नये यासाठी ६२ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, दरडीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी ३० हजार पीएपीची व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा – Gyanvapi mosque: ज्ञानवापी प्रकरणातील सुनावणीला कनिष्ठ न्यायालयात स्थगिती, उद्या सर्वोच्च न्यायालय फेरविचार करणार

First Published on: May 19, 2022 12:26 PM
Exit mobile version