करोना व्हायरस : इटीसी केंद्र बंद कालावधीत विशेष मुलांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचा अभिनव उपक्रम !

करोना व्हायरस : इटीसी केंद्र बंद कालावधीत विशेष मुलांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचा अभिनव उपक्रम !

कोरोना व्हायरस

व्हायरसपासून बचाव करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र बंदच्या कालावधीत विशेष मुलांच्या प्रशिक्षणात खंड पडू नये याची काळजी घेत सर्वांचे आरोग्य चांगले राहावे हा उद्देश नजरेसमोर ठेवून इटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांच्या संकल्पनेतून मुलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक विशेष शिक्षकाने दररोज किमान ०३ वर्कशीट, वर्ग सहाय्यकाने ०२ वर्कशीट तसेच सह शालेय  शिक्षकाने ०१ वर्कशीट बनवणे तसेच थेरपिस्ट व मानसोपचार तज्ज्ञ यांनीही आपल्याकडे थेरपी घेत असलेल्या मुलांचा विचार करून घरी करता येतील अशा साप्ताहिक ॲक्टिव्हिटीज तयार करणे अशा नाविन्यपूर्ण कामांस सुरूवात केली आहे.

सुट्टी जाहीर झाल्याच्या दिवसापासून या वर्कशीट ॲक्टिव्हिटी होम प्लानला सुरूवात करण्यात आली आहे. दररोज प्रत्येक शिक्षक व थेरपिस्ट हे इटीसी केंद्राच्या व्हॉट्स ॲप समुहावर या वर्कशीट पाठवतात. यामध्ये दररोज सरासरी ५०० हून अधिक ॲक्टिव्हिटीज पाठवल्या जातात. अशाच प्रकारे शिक्षक – पालक आणि थेरपिस्ट – पालक यांचे स्वतंत्र व्हॉट्स ॲप समुह असून त्यावरही या वर्कशीट पाठवण्यात येतात. यामध्ये प्रत्येक मुलाचा स्वतंत्र विचार करून शैक्षणिक साहित्य बनवण्यात येत आहे. गरजेनुसार फोन कॉल, व्हिडीओ कॉल, व्हॉट्स ॲप, ई मेल यांचा उपयोग करून प्रत्येक पालकाच्या संपर्कात राहून त्यांच्या विशेष मुलासाठी नवनवीन त-हेचा विकसित अभ्यास ‍दिला जात आहे. याची माहिती दररोज इटीसी केंद्र संचालकांना दिली जाते.

या उपक्रमामुळे कर्मचारी व पालक हे दोघेही मिळालेली सुट्टी ही सत्कारणी लागत असल्याबद्दल समाधानी आहेत. विशेष मुलांच्या शिक्षण – प्रशिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी सर्वच विशेष शिक्षक, प्रशिक्षक वेगवेगळया वर्कशीट बनवत आहेत. दररोज शिकवताना मुले समोर असतात, त्यामुळे त्यांना प्रतिसादानुसार शिकवले जाते. परंतू आता मुले प्रत्यक्ष समोर नसल्याने विचारपूर्वक वर्कशीट बनवाव्या लागतात. त्यामुळे घरी असलो तरी मुलांचा विचार सातत्याने मनात असतो असा अनुभव विशेष शिक्षकांनी सांगितला आहे.

सर्वसाधारणपणे विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रमाकडे जास्त लक्ष दिले जात असते. परंतू या काळात सुट्टी असल्याने सह शालेय ॲक्टिव्हिटीज मोठया प्रमाणात विशेष मुलांसाठी उपलब्ध करून देता येत असल्याचे सहशालेय शिक्षकांनी आवर्जून सांगितले. तसेच यातून विशेष मुलांची स्वत:ची निरीक्षण क्षमता व नाविन्यपूर्णता दिसत असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. सर्व सहशालेय शिक्षक एकमेकांशी चर्चा करतात व विचारपूर्वक एकेक विषय घेऊन त्याविषयीच्या नव्या वर्कशीट तयार करत आहेत. यातून मुलांनाही केवळ अभ्यास केला असे न वाटता, काहीतरी नवे शिकत असल्याचा अनुभव मिळत आहे. यामध्ये दैनंदिन अभ्यास होत आहेच, त्या व्यतिरिक्त काही वेगळे सृजनशील काम करण्याचा आनंददायी अनुभव मिळत असल्याचेही मत अनेकांनी व्यक्त केले.

व्यवसायोपचार तज्ज्ञ, भौतिकोपचार तज्ज्ञ व श्रवण वाचा तज्ज्ञ यांनांही पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. यात घरातील कोणते साहित्य वापरून, कोणत्या कौशल्यांचा विकास करता येईल, याबाबत पालकांना मार्गदर्शन केले जात आहे. तसेच मानसोपचार तज्ज्ञ हे देख्रील मुलांसाठी विविध कृतीशील प्रयोग तयार करत आहेत. त्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज घरातील सर्व सदस्यांनी मिळून अथवा भावंडांनी मिळून करण्यायोग्य ‍दिल्या जात असल्याने विशेष मूल ही सर्वांची जबाबदारी आहे हा संदेश पोहोचवला जात आहे. याव्दारे विशेष मुलांमधील सामाजिक कौशल्यांचा विकास होण्यासाठी मदत होत आहे. याबाबत अनेक पालकांनी अत्यंत सकारात्मक परिणाम होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच मानसोपचार तज्ज्ञांनी मुलांचे घरामधील वर्तन समजून घेण्यासाठी पालकांना बियेव्हियर ऑब्झर्वेशन चार्ट बनवण्याबाबत केलेले मार्गदर्शन उपयुक्त ठरत असल्याचे पालकांनी सांगितले.

या सर्व उपक्रमाबाबत पालकांचा अभिप्राय घेतला असता अनेक पालकांनी सुट्टी असली तरी इटीसी केंद्रातील सर्व कर्मचारी आपल्यासाठी उपलब्ध आहेत, वेळोवेळी फोनवरून, व्हॉट्स ॲपवरून आपल्या मुलांच्या प्रगतीचा, दैनंदिन अभ्यासाचा आढावा घेत आहेत, वर्कशीट सोडवण्यात काही अडचण आल्यास आम्हाला समजावून देत आहेत, याव्दारे मुलांचे कोणत्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होऊ न देण्याची खबरदारी घेतली जात आहे याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. केवळ पालकांनी सांगितले तर मुले अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतात, मात्र हे वर्गशिक्षकांनी पाठवले आहे असं सांगताच मुले उत्साहाने दिलेली ॲक्टिव्हिटी पूर्ण करतात अशीही प्रतिक्रिया अनेक पालकांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे.

First Published on: March 24, 2020 4:23 PM
Exit mobile version