महाराष्ट्रात श्रीमंतांसाठी लॉकडाऊन नाही का? वाधवान प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचा सवाल!

महाराष्ट्रात श्रीमंतांसाठी लॉकडाऊन नाही का? वाधवान प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचा सवाल!

येस बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेल्या वाधवान कुटुंबियांसोबत एकूण २३ जण लॉकडाऊनच्या काळात खंडाळ्याहून थेट महाबळेश्वरला दाखल झाल्यावरून आता वाद पेटू लागला आहे. सामान्यांसाठी लॉकडाऊनचे नियम असूनही वाधवानसारखे श्रीमंत आणि गुन्हेगार बाहेर पडून कसे महाबळेश्वरला जाऊ शकतात? तेही गृहमंत्रालयाच्या पत्रावर? असा
सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. आत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ‘राज्यातल्या श्रीमंत धनाढ्यांसाठी लॉकडाऊन नाही का?’ असा प्रश्न त्यांनी ट्वीटरवरून विचारला आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे माजी मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी ट्वीटमध्ये उपस्थित केलेले मुद्दे महत्त्वाचे मानले जात आहेत.

काय म्हणाले फडणवीस?

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून सरकारवर टीका करताना
म्हटलंय की, ‘राज्यामध्ये श्रीमंत धनाढ्यांना लॉकडाऊन नाही का? पोलिसांच्या परवानगीने हे थेट महाबळेश्वरमध्ये सुट्टी एन्जॉय करू शकतात. एक ज्येष्ठ आयपीएस अधिकारी ही अशी परवानगी देताना त्याच्या परिणामांचा विचार करणार नाही हे होऊच शकत नाही. कुणाच्या आदेशाने किंवा मेहेरबानीने अशी परवानगी देण्यात आली? मुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्री महोदय, तुम्ही आम्हाला याचं उत्तर देणं लागता’.

‘गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’

दरम्यान, फडणवीसांसोबतच त्यांच्याच मंत्रिमंडळात एक ज्येष्ठ मंत्री राहिलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर थेट गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. ‘पॅरोलवर बाहेर असलेल्या आरोपींना सीबीआयच्या ताब्यात देण्याऐवजी राष्ट्रवादीकडे असलेल्या राज्याच्या गृहखात्याने विशेष सवलत दिली. गृहमंत्र्यांना अंधारात ठेऊन असं पत्र देणं अशक्य आहे. गृहमंत्र्यांची सखोल चौकशी करून त्यांचा त्वरीत राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा’, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

काय आहे प्रकार?

राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर योग्य कारण असल्याशिवाय कुणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. मात्र, तरीदेखील वाधवान बंधू, त्यांचे कुटुंबीय आणि इतर असे एकूण २३ जण पाच गाड्यांमधून खंडाळ्यातून महाबळेश्वरला त्यांच्या फार्महाऊसवर पोहोचले. ईडी आणि सीबीआय वाधवान बंधूंच्या मागावर आहे. मात्र, कोरोनाचं कारण देऊन ईडीच्या समन्सला हुलकावणी देणारे वाधवान बंधू महाबळेश्वरला मात्र पोहोचले. धक्कादायक बाब म्हणजे गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनीच त्यांना विशेष परवानगीचं पत्र दिलं होतं. त्यामुळे या मुद्द्यावरून आता वातावरण पेटायला सुरुवात झाली आहे.


वाचा सविस्तर – घोटाळेबाज वाधवान कुटुंबीय प्रधान सचिवांच्या पत्राने महाबळेश्वरला, चौकशी सुरू!
First Published on: April 9, 2020 11:49 PM
Exit mobile version