सीईटीला मुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा होणार परीक्षा 

सीईटीला मुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा होणार परीक्षा 

मुंबई व परिसरात सकाळी १०.१५ च्या सुमारास अचानक खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी सीईटीच्या पहिल्या सत्रातील परीक्षेला पोहचू शकले नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सीईटी सेलकडून परीक्षा चुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीईटी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

एमएचटी सीईटीच्या पीसीएम विभागाच्या परीक्षा १२ ते २० ऑक्टोबरदरम्यान सीईटी सेलकडून घेण्यात येत आहेत. या परीक्षा दोन सत्रामध्ये घेण्यात येत आहेत. पहिल्या सत्रातील परीक्षा १० वाजता तर दुसर्‍या सत्रातील परीक्षा २.३० वाजता होत आहे. परंतु सोमवारी वीज पुरवठ्यामध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील पुरवठा अचानक खंडित झाला. यामुळे मुंबईचे जनजीवन काही अंशी ठप्प झाले. तसेच लोकल सेवाही ठप्प झाली. लोकलने सीईटीच्या पहिल्या सत्रातील परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना त्यामुळे वेळेवर परीक्षा केद्रावर पोहचणे शक्य झाले नाही. मुंबईतील पाच केंद्रावरील विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रामध्ये परीक्षा देता आली नाही. ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनियरींग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी, ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च, ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज करियर डेव्हल्पमेंट, बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, डॉन बॉस्को सेंटर असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. परीक्षा केंद्रावर उशीरा पोहोचलेल्या काही विद्यार्थ्यांना दुसर्‍या सत्रात परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली. मात्र काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचता आले नाही तर काहींना विद्यार्थ्यांना उशीर झाल्याने त्यांना परीक्षा देता आली नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी २० ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घेण्याचा निर्णय सीईटी सेलकडून परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

First Published on: October 12, 2020 7:18 PM
Exit mobile version