सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील विजयानंतर गायब असलेल्या नितेश राणेंच्या फेसबुक पोस्टनं खळबळ; ‘गाडलाच’ फोटो व्हायरल

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील विजयानंतर गायब असलेल्या नितेश राणेंच्या फेसबुक पोस्टनं खळबळ; ‘गाडलाच’ फोटो व्हायरल

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गातील राजकारण चांगलं टिपेला पोहोचलंय. मग तो संतोष परब हल्ला प्रकरण असो किंवा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक असो. सिंधुदुर्गातील राजकारण धगधगतं राहिलंय. संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय. त्यामुळे नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार आहे.

विशेष म्हणजे अटकेची टांगती तलवार असतानाच नितेश राणेंनी केलेली फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या फेसबुक पोस्टमध्ये नितेश राणेंनी एक फोटो शेअर केलाय, त्या फोटोला गाडला अशी कॅप्शन दिलीय. फोटोमध्ये सतीश सावंतांच्या अंगावर नितेश राणे उभे असलेलं पाहायला मिळतंय. पण नितेश राणे गायब असूनही सोशल मीडियावर सक्रिय असल्यानं पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांच्या शोधाची तपासचक्रे गतिमान केली आहेत.

दुसरीकडे गिरगावातील भाजप कार्यालयाशेजारीच नितेश राणे यांचे बॅनर लावण्यात आलेत. या बॅनरवर नितेश राणे यांचा फोटो लावण्यात आला असून, ते हरवले आहेत, असं लिहिलंय. तसेच त्यांना शोधून देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस म्हणून दिली जाईल, असंही लिहिलंय. त्यामुळे राणेंना एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यानंतर नितेश राणेंची ही फेसबुक पोस्ट आल्यानं चर्चांना उधाण आलंय.

दुसरीकडे नितेश राणेंचा जामीनअर्ज फेटाळल्यानंतर त्यांचे वकील मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. सिंधुदुर्ग न्यायालयाने दिलेल्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी सांगितले होते. न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळताना मोबाईल फोन जप्त करण्यासाठी कस्टडीची गरज असणार आहे, असे प्राथमिक कारण दिले होते. मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी या आदेशाला आव्हान दिले तरीही प्रत्यक्षात या प्रकरणातील सुनावणीसाठी सोमवार किंवा मंगळवार उजाडेल, असेही वकिलांनी स्पष्ट केले. त्यामुळे शुक्रवारी याचिका दाखल झाली तरीही फाईल केली तरीही याचिका बोर्डावर यायला दोन दिवस जातील, असेही ते म्हणाले.

First Published on: December 31, 2021 12:52 PM
Exit mobile version