बोफोर्सचा कलंक मिटवण्यासाठी मोदींवर खोटे आरोप

बोफोर्सचा कलंक मिटवण्यासाठी मोदींवर खोटे आरोप

खासदार पूनम महाजन

गांधी परिवारावर असलेला बोफोर्स घोटाळ्याचा कलंक मिटवण्यासाठीच राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. सुप्रीम कोर्टानेही राफेलमध्ये कोणताही घोटाळा झाला नसल्याचे म्हटले आहे. खोट्या माहितीच्या आधारे राहुल गांधी राफेल प्रकरणी आरोप करत आहेत. त्या खोट्या माहितीचे खबरी कोण आहेत हे राहुल गांधी यांनी स्पष्ट करावे, असा प्रश्न खासदार पूनम महाजन यांनी केला आहे.

मागील काही दिवसांपासून ‘चौकीदार ही चोर है’ अशी टीका करत काँग्रेसकडून राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असून राफेलमध्ये घोटाळा झाला नसल्याचे सांगितले. काँग्रेसच्या राफेलबाबतच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी यावर देशाच्या संसदेत चर्चा करावी. परंतु संसदेच्या बाहेर आरोप करत राहुल गांधी देशाची प्रतिमा मलिन करत आहेत, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

दरम्यान, भाजपकडून देशभरात ७० ठिकाणी पत्रकार परिषद घेतल्या जात आहेत. पुण्यातही भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाराष्ट्र भाजयुमो अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, भाजप पुणे अध्यक्ष योगेश गोगावले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरली मोहोळ, नगरसेवक दीपक पोटे उपस्थित होते.

First Published on: December 18, 2018 4:03 AM
Exit mobile version