धक्कादायक! पुण्यात करोनाग्रस्त रूग्णांच्या कुटुंबाला टाकले वाळीत

धक्कादायक! पुण्यात करोनाग्रस्त रूग्णांच्या कुटुंबाला टाकले वाळीत

करोना व्हायरस

करोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. दरम्यान, करोना व्हायरस महाराष्ट्रात येऊन धडकला असून पुण्यातील करोनाग्रस्तांची संख्या पाच झाल्याची माहिती ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये करोना संशयित महिला आढळून आली आहे. ही महिला दुबईहून परतली होती. महिलेला नायडू रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पण एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्यात करोनाग्रस्त रूग्णांच्या कुटूंबीयांना वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

गेले दोन दिवस पुण्यात करोनाग्रस्त रूग्ण आढळल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच दक्षता घेतली जात आहे. भारतातही केंद्र सरकारन खबरदारी घेत लोकांमध्ये याविषयी जनजागृती केली जात आहे. विमानतळावरही तपासणी केली जात आहेत. दरम्यान, या संशयित रुग्णांनंतर दुबईहून आलेल्या प्रवाशांचीही तपासणी करण्यात येणार आहे. करोना संशयितांची काळजी सरकारकडून घेतली जात आहे. मात्र तरीही पुण्यात करोनाग्रस्त रूग्णांच्या कुटूंबीयांना वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. करोनाग्रस्त रूग्णांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. लवकरच ही तक्रार सायबर सेलकडे करण्यात येईल आणि योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

रूग्णांची ओळख उघड न करण्याचं प्रशासनाने आवाहन केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यातील करोनाग्रस्त रूग्णांची माहिती उघड झाली होती. त्यानंतर या रूग्णांच्या कुटूंबियांना अक्षरश: वाळीत टाकण्यात आलं. या कुटूंबियांनी पुण्यात राहू नये, घर सोडावं असा धोशा आजूबाजूच्या लोकांनी लावला.

असा आला पुण्यात करोना

करोना बाधीत पुण्यातील कुटुंबासोबत विमानातून प्रवास करणाऱ्या मुंबईतील सहा प्रवाशांना मंगळवारी मुंबई महापालिकेने शोधून काढले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्या सहा प्रवाशांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून आज बुधवार्यंत वैद्यकीय चाचणी अहवाल येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुरेश काकणी यांनी दिली.

दरम्यान, पुण्यातील हे कुटुंब एका खासगी ट्रॅव्हल कंपनीसोबत दुबईला फिरायला गेले होते. त्यानंतर भारतात जेव्हा ते आले, त्यांनी पुण्यातील रुग्णालयात आपली वैद्यकीय तपासणी केली. या वैद्यकीय तपासणीत त्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, ह्या कुटुंबाला मुंबईहून पुण्याला घेऊन येणाऱ्या कॅब चालकाला देखील करोनाची लागण झाली. त्यालासुद्धा पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी कॅब चालक पुण्याचा असल्याचे सांगितले.


हे ही वाचा – करोना व्हायरसचा सुबोध भावेला फटका!


 

First Published on: March 11, 2020 6:35 PM
Exit mobile version