प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकरांना पक्षाघाताचा झटका

प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकरांना पक्षाघाताचा झटका

प्रसिद्ध कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ असलेले बंडातात्या कराडकर यांना पक्षाघाताचा झटका आल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाघाताच्या झटक्यानंतर बंडातात्या कराडकर यांना साताऱ्यातील फलटणच्या निकोप रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. (Famous kirtan artist Bandatatya Karadkar suffered a stroke)

मिळालेल्या माहितीनुसार, बंडातात्या कराडकर हे पुण्याहून कीर्तन करुन फलटण तालुक्यातील पिंप्रद इथल्या मठात आले होते. बंडातात्या यांना गुरूवार 12 जानेवारी रोजी सकाळी त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना निकोप हॉस्पिटलमध्ये त्यांच्या साधकांनी दाखल केले होते. त्यावेळी तात्यांचा रक्तदाब आणि शुगर खूपच वाढल्याने त्यांचा त्रास वाढला होता. यामुळे त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका येऊन गेल्याचे लक्षात येताच हॉस्पिटलमधील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार सुरु केले.

गुरूवारी उपचारानंतर बंडातात्या कराडकर यांची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर त्यांचा MRI आणि अँजिओग्राफी केल्यावर मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांत थोडे ब्लॉकेज असल्याचे दिसून आले. त्यामुळे मेंदूला होणार रक्तपुरवठा कमी होत असल्याने डॉक्टरांनी यावर देखील तातडीने उपचार सुरु केले.

कोरोनाकाळात पायी वारीसाठी आग्रह

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं गर्दी टाळण्यासाठी आषाढीच्या पायी दिंडीला परवानगी नाकारली होती. पण त्याला विरोध करत बंडातात्या कराडकर यांनी पायी वारी सुरू केली होती. त्यावेळी बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात कारवाईदेखील झाली होती. बंडातात्या कराडकर हे पंढरपूरच्या दिशेनं पायी निघाल्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मंदिरं बंद होती, त्यावरूनही बंडातात्या यांनी सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. या निर्णयाच्या विरोधात दिवाळी साजरी न करण्याचं आवाहन बंडातात्या यांनी केलं होतं.

दरम्यान, मागील सरकारने किराणा दुकानामध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून सरकारवर टीका करताना बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. सर्व पक्षातील महिला नेत्यांनी बंडातात्यांवर त्यावरून टीका केली होती. राज्य महिला आयोगानंदेखील त्यांच्या या वक्तव्याची दखल घेतली. त्यावेळी बंडातात्या यांच्यावर सातारा पोलिसांनी कारवाई करावी आणि दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले होते.


हेही वाचा – सत्यजित तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, नाना पटोलेंचं मोठं विधान

First Published on: January 13, 2023 11:52 AM
Exit mobile version