कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बागलाण तालुक्यातील चिराई येथील शिवारात रविवारी ( दि.२१) कर्जबाजारीपणाला कंटाळून पहाटेच्या सुमारास एका शेतक-याने शेतातील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. डोक्यावर असलेले डोंगराएवढं कर्ज फेडायचं कसे? या काळजीतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. अनिल पांडुरंग आहिरे (वय ४७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

चिराई शिवारातील अल्पभूधारक शेतकरी अनिल आहिरे यांच्या नावे अडीच एकर जमीन आहे. शेतीसाठी त्यांनी विविध सहकारी सोसायटीचे दोन लाख, बँक ऑफ महाराष्ट्र, टेंभे येथील शाखेतून कर्ज घेतले आहे. तसेच वित्तीय महामंडळ महींद्रा रूरल हौसिंग फायनान्स लि. वरळी मुंबई शाखा १.५ लाखांचा बोजा सातबाऱ्यावर दर्शविला आहे. कर्जाचा डोंगर वाढतच असल्याने; गेल्या अनेक दिवसांपासून अनिल आहिरे अस्वस्थ झाले होते, असे कुटुंबियांनी सांगितले. रविवार (दि.२१) पहाटेच्या सुमारास कुटुंबियांनी त्यांच्या बेडरूमचा दरवाजा उघडला असता त्यांनी छताला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती कळताच कुटुंबियांनी टाहो फोडल्याने आजूबाजूला असलेल्या शेतक-यांनी धाव घेतली. याबाबत जायखेडा पोलीसांत आत्महत्येची माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल कोळी, हवालदार जी. एल. महाजन, बापु फंगाळ, आर. डी. वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. महसूलचे मंडळ अधिकारी सी. पी. आहिरे, तलाठी अर्जुन अव्हाळे यांनी पंचनामा केला व तातडीने वरिष्ठांना याबाबत अहवाल सादर केला. अनिल आहिरे यांचे नामपुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात सोपवण्यात आला.

First Published on: June 21, 2020 8:17 PM
Exit mobile version