दिल्लीतील शेतकरी आंदोलन पेटले

दिल्लीतील शेतकरी आंदोलन पेटले

कृषी विधेयक २०२० विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकर्‍यांनी बुराडी येथील मैदानात जाऊन आंदोलन करावे, हे केंद्र सरकारने केलेले आवाहन शेतकर्‍यांनी धुडकावून लावले आहे. बुराडी खुल्या तुरुंगासारखे आहे. त्यामुळे आम्ही तिथे कधीच जाणार नाही, असे शेतकर्‍यांनी सांगितले आहे.

बीकेयू क्रांतिकारी (पंजाब) या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरजित सिंग फूल यांनी सांगितले की, चर्चेसाठी शेतकर्‍यांसमोर अटी ठेवणे हा शेतकर्‍यांचा अपमान आहे. आम्ही बुराडी येथे कधीच जाणार नाही. बुराडी हा ओपन पार्क नाही तर ओपन जेल आहे. त्यामुळे आम्ही बुराडी येथे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. बुराही ही जागा खुल्या तुरुंगाप्रमाणे असल्याचे पुरावे आम्हाला मिळाले आहेत.

उत्तराखंड किसान संघाच्या अध्यक्षांना दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर येथे नेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांना बुराडी येथील मैदानात नेऊन बंद करण्यात आले, असे सूरजित सिंह फूल यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकरी संघटनेला ३ डिसेंबर रोजी चर्चेला येण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, हा प्रस्ताव अमित शाहा यांनी फेटाळून लावला होता.

नवा कृषी कायदा मागे घेण्यासह शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला. शेतकरी नेत्यांच्या बैठकीस उपस्थित असलेले स्वराज पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांनी सांगितले की, आज सकाळी पंजाबच्या ३० शेतकरी संघटनांची बैठक झाली. अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काल रात्री गृहसचिवांनी पाठवलेल्या पत्रात कृषी कायद्याबाबत चर्चा करण्यासाठी रस्ते रिकामी करून बुराडी येथे येण्याची अट घालण्यात आली होती. शेतकर्‍यांनी ही अट फेटाळून लावली आहे. आमचा हेतू रस्ता अडवून जनतेला त्रस्त करण्याचा नाही आहे. शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने अटी घालून प्रस्ताव पाठवणे योग्य नाही.

शेतकर्‍यांशी चर्चा करा – अण्णा हजारे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सरकार आणि शेतकर्‍यांमधील सध्याची परिस्थिती ही भारत-पाकिस्तानसारखी झाली आहे. शेतकर्‍यांचे न ऐकायला ते काय पाकिस्तानातून आलेत का?, असा प्रश्न अण्णा हजारे यांनी सरकारला विचारला आहे. निवडणुकीच्या वेळी मते मागायला शेतकर्‍यांच्या बांधावर जाता, मग शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू असताना त्यांच्याशी चर्चा करायला का जात नाही? दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी काय पाकिस्तानातून आलेत का? उद्या जर हिंसा भडकली तर त्याला जबाबदार कोण?, असे अण्णा हजारे म्हणाले.

First Published on: November 29, 2020 11:58 PM
Exit mobile version