बंद किसान रेल्वे सुरू करा, अन्यथा रेल रोको; शेतकऱ्यांचा मध्य रेल्वेला इशारा

बंद किसान रेल्वे सुरू करा, अन्यथा रेल रोको; शेतकऱ्यांचा मध्य रेल्वेला इशारा

शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी सुरू करण्यात आलेली किसान रेल्वे मध्य रेल्वे प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. किसान रेल्वे बंद करताना मध्य रेल्वेने शेतकऱ्यांना काही कारणं दिली आहेत. मात्र ही कारणं ऐकताच शेतकरी आवाकू झाल्याचं समजतंय. तसंच, मध्य रेल्वेच्या किसान रेल्वे बंद करण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी विरोधी केला असून, रेल्वे सुरू न केल्यास रेल रोको आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

मध्य रेल्वेचे शेतकऱ्यांना कारण

किसान रेल्वे ३० एप्रिलपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे. ज्या रेल्वेलाइनवरून किसान रेल्वे जाते त्याच लाइनवरून मालगाडीतून कोळशाची वाहतूक केली जाते. उन्हाळ्यामुळे किसान रेल्वे एका जागेवर जास्त वेळ थांबवल्यास शेतीमाल खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे मध्य रेल्वेने तात्पुरत्या स्वरूपात किसान रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. किसान रेल्वे बंद झाल्यामुळे मोठा फटका बसला आहे.

शेतकऱ्यांचा रेल्वेला चांगला प्रतिसाद

सांगोला तालुक्यातील डाळिंबासह इतर फळे, भाजीपाल्यास परराज्यातील बाजारपेठ उपलब्ध व्हावी, उत्पादक शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिकचे उत्पन्न मिळावे यासाठी २१ ऑगस्ट २०२० रोजी सांगोला येथून पहिली किसान रेल्वे सुरू झाली. कोरोनाकाळात सांगोला रेल्वे स्टेशन मध्य रेल्वेचे उत्पन्नाचे स्त्रोत बनले होते. एकूण तीन किसान रेल्वेगाड्या सुटत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा डाळिंब, द्राक्ष, पपई, पेरू, सीताफळ, चिकू, शिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची, शेवगा, आले, लिंबू असा शेतीमाल देशातील विविध राज्यांमध्ये कमी खर्चात वाहतूक होऊन सुरक्षित पोहोच होत होता.

रेल्वेला सुमारे ३२ कोटी रुपयाचा फायदा

केवळ सांगोला नव्हे तर आटपाडी, कवठेमंकाळ, जत, मंगळवेढा, कर्नाटकातील विजापूर येथील शेतकऱ्यांचा शेतीमाल परराज्यातील बाजारपेठेत वेळेत पोहोचवला जात होता. किसान रेल्वे चालू झाल्यापासून सांगोला रेल्वे स्टेशन येथून सुमारे ७९ हजार टन शेतीमालाच्या वाहतुकीतून रेल्वेला सुमारे ३२ कोटी रुपयाचा फायदा झाला आहे.

वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना न परवडणारा

वाढत्या डिझेल दरवाढीमुळे ट्रान्सपोर्ट वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. बंद केलेली किसान रेल्वे तत्काळ पूर्ववत सुरू करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने सांगोला रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. तसंच, या किसान रेल्वेला प्रतिसाद मिळत असतानाही अचानक बंद केल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.


हेही वाचा – Myanmar : नोबेल विजेत्या आंग सान सू की यांना पाच वर्षांचा तुरुंगवास; भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी सुनावली शिक्षा

First Published on: April 27, 2022 1:51 PM
Exit mobile version