समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा ताफा पोहोचताच शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे

समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा ताफा पोहोचताच शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे या समृद्धी महामार्गाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्धा जिल्ह्यात पोहोचले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा स्टेअरिंग हातात घेतला होता. परंतु समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा ताफा पोहोचताच शेतकऱ्यांनी निषेध करत काळे झेंडे दाखवले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा पोहोचताच स्थानिक शेतकऱ्यांनी सरकारकडून शेतकऱ्यांची वीज कापली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत या बद्दल संताप व्यक्त केला. तसेच ‘राज्यपाल हटाव’ या मागणीसाठी असंख्य कार्यकर्ते रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत होते. यावेळी पोलिसांनी या सर्वांना आवरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, हा ताफा शेतकऱ्यांशी कुठलीच चर्चा न करता निघून गेल्याने शेतकरी प्रचंड नाराज झाले आहेत.

नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तेथून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज पाहणी दौरा सुरु केला. वर्धा जिल्ह्यात समृद्धीचा 55 किलोमीटरचा मार्ग आहे. वर्धा जिल्ह्यात महामार्गावर दोन टोल प्लाझा देण्यात आले आहे. यापैकी विरुळ येथे टोल प्लाझा आणि परिसराची त्यांनी पाहणी केली. येथे आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार तसेच समृद्धी महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे, ही खूप अभिमानाची बाब आहे. तसेच महामार्गाचे लोकार्पण करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं आहे, याचा आम्हाला आनंद आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती, समृद्धी महामार्गाची केली पाहणी


 

First Published on: December 4, 2022 7:28 PM
Exit mobile version