धक्कादायक! मराठवाड्यात महिन्याभरात ६३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

धक्कादायक! मराठवाड्यात महिन्याभरात ६३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

प्रातिनिधिक फोटो

एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना केल्याचा दावा करत असताना दुसरीकडे राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती मात्र सुधारताना दिसत नाही. अजूनही महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये शेतकरी नैराश्याच्या गर्तेत अडकल्याचं चित्र समोर येत आहे. सरकार आरक्षणाच्या मुद्द्यांमध्ये गुरफटलेलं असताना बळीराजा मात्र कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. हे धक्कादायक वास्तव समोर आणणारी एक आकडेवारी नुकतीच समोर आली असून या आकडेवारीनुसार गेल्या महिन्याभरात एकट्या मराठवाड्यात ६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यातल्या ८ जिल्ह्यांमध्ये या आत्महत्या झाल्याचं समोर आलं आहे.

बीडमध्ये झाल्या सर्वाधिक आत्महत्या

न्यू इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातून यासंदर्भातली आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार या ६३पैकी सर्वाधिक १९ आत्महत्या या बीडमध्ये झाल्या आहेत. त्यापाठोपाठ उस्मानाबादमध्ये १४, नांदेडमध्ये ८ तर औरंगाबाद आणि परभणीमध्ये प्रत्येकी ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. याशिवाय लातूरमध्ये ४ तर जालना आणि हिंगोलीमध्ये प्रत्येकी २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्याची माहिती विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातून समोर आली आहे.

८ महिन्यांत ५९० आत्महत्या

मराठवाड्यातल्या गेल्या महिन्याभरातल्या आकडेवारीसोबतच महाराष्ट्रात १ जानेवारी ते २६ ऑगस्ट २०१८ या ८ महिन्यांमध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्यांचा आकडा ५९०वर पोहोचला आहे. कर्जबाजारीपणा, कोरडा दुष्काळ, हमीभावाचा अभाव आणि उत्पादनात घट या कारणांचा प्रामुख्याने समावेश आहे.

फक्त ३४५ शेतकऱ्यांनाच मिळाली मदत

दरम्यान, या ५९० आत्महत्या प्रकरणांमध्ये फक्त ३४५ प्रकरणेच मदतनिधीसाठी पात्र ठरली आहेत. त्यातून ३३३ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतनिधी देण्यात आला आहे, तर १५१ प्रकरणांमध्ये चौकशीअंती मदतनिधी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ९४ प्रकरणांमध्ये अद्याप चौकशी सुरु असल्याची माहितीही राज्यभरातल्या विभागीय आयुक्तालयांमधून समोर आली आहे.

First Published on: August 31, 2018 4:11 PM
Exit mobile version