त्र्यंबकेश्वर पुरोहित राडाप्रकरणी ‘या’ पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल

त्र्यंबकेश्वर पुरोहित राडाप्रकरणी ‘या’ पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधी करण्यावरून स्थानिक आणि प्रातंस्थ (नाशिकच्या बाहेरचे) यांच्यामधील वाद पुन्हा उफाळून आला आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रिंगरोड वरील स्वामी समर्थ गुरुपिठाच्या समोर असेलल्या आनंद आखाड्याच्या आवारामध्ये तीन पुरोहित नारायण नागबळी हा विधी करत असल्याचे समजल्याने स्थानिक पुरोहितांचे पन्नास ते साठ व्यक्ती तिथे पोहचले. त्यांनी शेखर कुलकर्णी, प्रशांत सवई, सुरेश सर्वज्ञ या तीन पुरोहितास बेदम मारहाण केली. त्यानंतर या तीनही पुरोहितानी त्र्यंबक पोलीस ठाण्यात आता तक्रार दाखल केली.

या प्रकरणी रात्री उशिरा स्थानिक 17 पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात मोहन लोहगावकार, कमलेश जोशी, आनंद जोशी, पिंटू लोहगावकर, प्रशांत गायधनी, अक्षय शुक्ल, यश मिलिंद शिखरे, पियुष देवकुटे, मयुर थेटे, सचिन शुक्ल यांच्यासह इतर स्थानिक पुजाऱ्यांचा समावेश आहे.

त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या नारायण नागबळी, कालसर्प शांती, त्रिपिंडी ईत्यादी धार्मिक विधींमुळे येथील अर्थकारण तेजीत आले आहे. त्यामुळे प्रातंस्थ पुरोहित येथे येऊन आम्हालाही हे विधी करु द्या म्हणून हक्क सांगत आहेत. तथापि स्थानिक पुरोहित हे विधी करण्याचा अधिकार केवळ आम्हालाच आहे आणि तशी ऐतिहासिक कागदपत्रे असल्याचा दावा करत आहेत. मात्र प्रातंस्थ पुरोहितांनी भारतीय राज्यघटनेचा दाखला देत कोणालाही, कोणताही व्यवसाय, कोठेही जाऊन करण्याचा हक्क असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आम्ही देखील नारायण नागबळी विधी करणारच असा निर्धार त्यांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा संघर्ष सुरु आहे. आज शुक्रवारी असे विधी करणारे प्रातंस्थ यांनी आनंद आखाड्याकडून जागा भाड्याने घेऊन हा विधी सुरु केला होता.

याबाबत स्थानिक पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे येथे देश-विदेशातील भाविक नारायण नागबळी करण्यासाठी येत असतात. हे विधी फक्त त्र्यंबकेश्वर येथेच होतात आणि ते अहिल्या गोदावरी संगमावर ठराविक जागेवरच करावे लागतात. प्रातंस्थ पुरोहित अशा प्रकारे कोठेही, कश्याही प्रकारे विधी करत असल्याने ते भाविकांची दिशाभूल करत असल्याचे स्थानिक पुरोहितांचे म्हणणे आहे. तर आम्ही येथेच विधी शिकलो असून त्यात कसलीही फसवणूक नसल्याचे प्रातंस्थ पुरोहित सांगत आहेत.

First Published on: June 8, 2019 12:12 AM
Exit mobile version