मुंबईत पाच, राज्यात ३३ करोना पॉझिटिव्ह रुग्ण

मुंबईत पाच, राज्यात ३३ करोना पॉझिटिव्ह रुग्ण

प्रातिनिधिक छायाचित्र

करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कोवीड १९ उपाययोजना अधिसूचना लागू झाल्याने सरकारी पातळीवर सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. सध्या मुंबईत करोनाचे पाच पॉझिटिव्ह रुग्ण कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचारांखाली आहेत. तर, राज्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३३ नोंद करण्यात आली आहे.

शनिवारी रात्री उशिरा पिंपरी चिंचवड येथे ५ आणि रविवारी सकाळी औरंगाबाद येथे १ रुग्ण करोनाबाधित आल्याने राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ झाली असून औरंगाबाद मधील हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या ५९ वर्षीय महिलेने रशिया आणि कझाकिस्तान येथे प्रवास केलेला आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण १०४३ प्रवासी आले आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १५८४ विमानांमधील १ लाख ८१ हजार ९२५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.

१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ७५८ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ६६९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यातील विविध विलगीकरण कक्षामध्ये ७५ संशयित रुग्ण भरती आहेत.

राज्यातील करोना रुग्णांची आकडेवारी

पिंपरी चिंचवड मनपा – ८ रूग्ण, पुणे – ८, मुंबई – ५, नागपूर – ४, यवतमाळ – २, रायगड, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर प्रत्येकी एक असे एकूण ३३ रूग्ण आहेत.

साथरोग अधिनियम कायदा १८९७ लागू

राज्यात १३ मार्च २०२० पासून साथरोग अधिनियम कायदा १८९७ लागू करण्यात आला असून त्याअनुसार या अधिनियमाच्या खंड २, ३ आणि ४ नुसार महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० ही अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. या अधिनियमानुसार कोविड १९ उद्रेक प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आयुक्त, आरोग्य सेवा, संचालक आरोग्य सेवा, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त हे सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात या उद्रेक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी त्यांना विशेषाधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

मुंबईतील आकडेवारी खालीलप्रमाणे

मुंबईत स्क्रिनिंग केलेल्या प्रवाशांची संख्या – २ लाख ३० हजार ५८९
एकूण संशयित – ४१८
दाखल निगेटिव्ह रिपोर्ट संख्या – ३३४
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या – ५
१५ तारखेचे निगेटिव्ह रिपोर्ट – ४३

First Published on: March 15, 2020 10:06 PM
Exit mobile version