करोनापासून जीव वाचवायला गेले रस्‍ता अपघातात बळी पडले

करोनापासून जीव वाचवायला गेले रस्‍ता अपघातात बळी पडले

मुंबई-अहमदाबाद हायवेवर भारोळ येथे झाला अपघात

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून १४ एप्रिलपर्यंत देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर हातावर पोट असणार्‍या मुंबईतील मजूरांच्या मनात घबराट निर्माण झाली आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसर्‍या बाजूला रोजीरोटीचे वांदे झाले आहेत. त्यामुळे मिळेल त्या मार्गाने ते मुंबई सोडून आपल्या मूळ गावी निघाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा कष्टकर्‍यांच्या अन्नपाण्याची सरकार सोय करेल, त्यांनी मुंबई सोडू नये, असे आवाहन केले आहे. पण तरीही मुंबईत काम करणारे मजूर थांबायला तयार नाहीत, त्यातूनच मुंबई-अहमदाबाद हायवेवर भारोळ येथे अपघातात सापडून पाच मजूरांचा मृत्यू झाला. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

रोजगार नसल्याने घराकडे निघालेल्या सात मजूरांना भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोने चिरडले. यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोेघेजण गंभीर जखमी झाले आहेत. लॉकडाऊनमुळे रोजगार नसलेेले मजूर राजस्थान येथील आपल्या मूळ गावी निघाले होते. जाण्यासाठी वाहन नसल्याने सर्वजण पायी निघाले होते. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद हायवेवर भरधाव वेगात आलेल्या एका आयशर टेम्पोने मजूरांना चिरडले. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एकावर उपचार सुरु असताना हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हायवेवरील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रमेश भट (वय 55, रा. नालासोपारा), निखिल पंड्या ( वय 32, रा. जोगेश्वरी), नरेशचंद्र कलासुवा ( वय 18,रा. वसई) आणि काळूराम भगोरा ( वय 18, रा. वसई) अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून एका मृताची ओळख पटली नव्हती. या अपघातात कल्पेश जोशी (वय 32, रा.भांडूप) आणि मयांक भट (वय 34, रा. वसई) हे दोन जण जखमी झाले आहेत. दोघांचीही प्रकृत्ती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. सर्वजण राजस्थान राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. काम नसल्याने सर्वजण एकत्रितपणे राजस्थानकडे निघाले होते. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, पालघर जिल्ह्यात रोजगार बुडालेले शेकडो मजूर गुजरात आणि राजस्थानकडे निघाले आहेत. संचारबंदीत वाहतूक ठप्प झाल्याने हे मजूर आपल्या कुुटुंबियांसमवेत मुंबई-अहमदाबाद हायवेवरून चालत निघाले आहेत. मात्र, शुक्रवार संध्याकाळपासून गुजरात-महाराष्ट्र सीमेवर गुजरात सरकारने सीमा सिल केल्या आहेत. गुजरात पोलीस कुणालाही प्रवेश करू देत नसल्याने शेकडो मजूर शुक्रवार रात्रीपासून सीमेवर अडकून पडले आहेत. मजूरांचे खाण्यापिण्याचेही हाल सुरु झाले आहेत.

कोल्हापूरकडे निघालेले जोडपे अपघातात ठार
लॉकडाऊनच्या भीतीने गावाला परतत असताना कोल्हापूर येथे झालेल्या भीषण अपघातात पतीसह मायलेक ठार झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने घाबरलेल्या एका जोडप्याने बाइकवरून गावची वाट धरली. पण, कोल्हापूरच्या शाहूवाडी येथे त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात या जोडप्यासहीत त्यांचा लहान मुलगाही ठार झाला. हे जोडपे शाहूवाडीतील जांबूर इथे राहत होते.

First Published on: March 29, 2020 6:55 AM
Exit mobile version