गडचिरोलीत मुसळधार; भामरागडमध्ये पूर, स्थानिकांचं स्थलांतर

गडचिरोलीत मुसळधार; भामरागडमध्ये पूर, स्थानिकांचं स्थलांतर

गडचिरोलीमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत

एकीकडे कोल्हापूर-सांगलीपाठोपाठ मुंबई देखील जलमय झालेली असताना तिकडे पूर्व महाराष्ट्रात गडचिरोलीमध्ये देखील पुरामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे. गडचिरोलीतली पर्लकोटा आणि छत्तीसगडमधून येणारी इंद्रावती या दोन नद्यांना आलेल्या पुरामुळे गडचिरोलीतल्या भामरागड आणि आसपासच्या भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान भामरागड तालुक्याचं झालं आहे. सध्या इतर भागातलं पाणी काही प्रमाणात ओसरलं असलं, तरी भामरागड हे तालुका मुख्यालयाचे गाव मात्र अजूनही पाण्याखाली आहे. पावसाचे पाणी वाढताच स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केल्यामुळे जीवितहानी टाळण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

इंद्रावतीने ओलांडली धोक्याची पातळी

गेल्या काही दिवसांपासून गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्यात आणि आसपासच्या काही गावांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. यामुळे तिथली पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहू लागली. मात्र, त्याचवेळी छत्तीसगडमधून येणाऱ्या इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या दोन्ही नद्यांचं पाणी भामरागड गाव आणि तालुक्यात आसपासच्या गावांमध्ये शिरलं. परिणामी इथे पूरस्थिती निर्माण झाली. इंद्रावतीच्या छत्तीसगडमधल्या नदीक्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावतीला पूर आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये भामरागड तालुक्यात १२० मिमीहून अधिक पाऊस झाला आहे.


हेही वाचा – कोल्हापुरात पुन्हा पूरस्थिती मुंबईलाही पावसाने झोडपले

भामरागड अजूनही पाण्याखालीच

दरम्यान, अजूनही भामरागड गाव पाण्याखालीच असून तिथल्या ३०० हून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. त्याशिवाय, गावातल्या गर्भवती महिला आणि आजारी नागरिकांना हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात हलवण्यात आलं आहे. तसेच, साचलेल्या पाण्यामुळे आरोग्याच्या निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी प्रशासनाने तयारी केली आहे. आसपासच्या गावांमधलं पाणी ओसरलं असलं, तरी भामरागड तालुक्यातलं पाणी ओसरण्यासाठी अजूनही काही काळ लागू शकतो, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

First Published on: September 9, 2019 9:50 AM
Exit mobile version